|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ती चूक मंत्र्याची नव्हे, खात्याच्या संचालकांची

ती चूक मंत्र्याची नव्हे, खात्याच्या संचालकांची 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील वारसास्थळाबाबत देखभालीसाठी आणि साधनसुविधा निर्मितीसाठी पुरातत्व खात्याकडून जे पत्र दिले गेले ते पुरातत्व खात्याच्या संचालकाच्या चुकीमुळे दिले गेले. त्यामुळे त्याबाबत खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांना दोषी धरता येणार नाही. जोपर्यंत त्यांना त्या गोष्टीची जाणीव असत नाही अशी सारवासारव गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत केली.

मंत्री विजय सरदेसाई यांचा राजीनामा मागीतलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर त्यांनी यावेळी टीका केली. सरकारचे प्रशासन कसे चालते हे चोडणकर यांना माहित नाही. कारण ते आमदार झालेले नाहीत असेही डिमेलो म्हणाले. मंत्री सरदेसाई यांना पाठिशी घालताना डिमेलो म्हणाले बऱयाचवेळा अधिकारी काय करतात हे मंत्र्यांना कळत नाही. जोपर्यंत फाईल मंत्र्यांना पाठविली जात नाही तोपर्यंत त्याना कळू शकत नाही. गोव्यातील चर्च खाजगी कंपन्याकडे दिले जातात हे सिद्ध करणारा पुरावा चोडणकर यांच्याकडे आहे का? असा प्रश्नही त्यांनी केला. जर चर्चला त्याबद्दल आक्षेप नसेल तर इतरांनी आक्षेप कशाला घ्यावा. योजना चांगली आहे म्हणून चर्चने मान्यता दिली मात्र तुम्ही आक्षेप घेणारे कोण असा थेट प्रश्न डिमेलो यांनी केला.

मंत्री सरदेसाई यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. सामंजस्य करार करताना चर्चला प्राधान्य दिले जाणार आहे. चर्चच्या वारसा स्थळांवर चांगल्या सुविधा निर्माण करून त्यांचा दर्जा वाढविला जाणार आहे. चर्चची मालमत्ता चर्चजवळच रहाणार आहे. नाहक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. या पत्रावर सही करणाऱया पुरातत्व खात्याच्या संचालकावर काय कारवाई करायची तो निर्णय मंत्री घेऊ शकतात. पर्यटन खात्याचे मंत्री बाबू आजगावकर यांच्या पत्राबाबत विचारले असता त्यांचा निर्णय त्यांना विचारा असे उत्तर डिमेलो यांनी दिले.