|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘तेजस्विनी’ ची कार्तिका आणि तानाजी यांचा विवाह थाटात

‘तेजस्विनी’ ची कार्तिका आणि तानाजी यांचा विवाह थाटात 

पोलीस अधीक्षक मोहिते यांनी केले कन्यादान

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापूर येथील शासकीय तेजस्विनी महिला वसतिगृहातील कार्तिकी राजू गुरव व भुये येथील तानाजी कृष्णाजी शियेकर यांचा विवाह शाहुपुरीतील चंदवाणी हॉल येथे थाटात संपन्न झाला. यावेळी पोलीस अधिक्षक संजय मोहिते यांनी कार्तिकीचे कन्यादान करून भावी आयुष्यासाठी या जोडप्याला शुभार्शिवाद दिले.

कार्तिकी ही इयत्ता 4 थी पासूनच जत येथील भगिनी निवेदीता बालसंकुलात होती. तिथेच तिने 10 वी पर्यंतचे शिक्षणही घेतले आहे. 18 वर्ष पुर्ण झाल्याने, ती दीड वर्षापूर्वी कोल्हापूरातील शासकीय तेजस्विनी महिला वसतिगृहामध्ये दाखल झाली होती. याठिकाणी तिने मायक्रॉन वर्क करणे, सेंट तयार करणे अशी विविध कौशल्ये आत्मसात केली आहेत. तर मूळ करवीर तालुक्यातील भुये येथील  कृष्णात पांडूरंग शियेकर यांचे जेष्ठ चिरंजीव तानाजी कृष्णात शियेकर यांचे सावंतवाडी येथे डायलेसिस सेंटर आहे. त्यांनी डायलेसिस टेक्निशियनचा अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. सीपीआर येथील कौन्सिलर माहेश्वरी पुजारी यांनी तानाजी शियेकर यांना कार्तिकी हिच्याबद्दलची माहिती दिली होती.

कार्तिकी राजू गुरव व भुये येथील तानाजी कृष्णाजी शियेकर यांच्या विवाहाप्रसंगी अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरूपती काकडे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नितिन म्हस्के, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, महिला बालविकासचे अधिक्षक बी.जी.काटकर, शासकीय तेजस्विनी महिला वसतिगृहाच्या अधिक्षिका सुजाता शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.