|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » करगणीत टोळक्याकडून युवकांना बेदम मारहाण

करगणीत टोळक्याकडून युवकांना बेदम मारहाण 

प्रतिनिधी/ आटपाडी

विद्यालयाच्या स्नेहसंमेलनातील भांडणाच्या रागातून करगणी (ता. आटपाडी) येथे टोळक्याने गावातीलच तरूणांना रॉड, काठी, कुऱहाडीसह काठीने करून मारहाण केली. या मारहाणीत सातजण जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना सांगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मारहाणीमुळे दोन समाजामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून या मारहाणप्रकरणी  11 जणांवर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणीमध्ये सुनील वसंत मंडले, विष्णू मंडले, लायन मंडले, रमेश मंडले, विलास निळे, गजू चव्हाण, नितीन निळे (सर्व रा. करगणी) हे जखमी झाले आहेत. तर करगणीतीलच ऋषिकेश पाटील, धीरज पाटील, अशोक सरगर, विशाल पांढरे, प्रशिल पाटील, प्रकाश सरगर, आनंदा शेंडगे (रा.पेड), अमोल सरगर, भारत पाटील, उत्कर्ष पिंजारी, रोहन देवकाते यांच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.

सुनील मंडले याने दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी महिन्यात गावातील एका हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. यावेळी नाचण्याच्या कारणावरून दोन समाजाच्या तरूणाईंच्या गटामध्ये भांडण झाले होते. त्याच्या रागातून मंगळवारी दादा मंडले व भारत पाटील यांच्यात वादंग होऊन पाटील याने फेसबुकवर जातीवाचक आक्षेपार्ह मजकूर टाकला. गुरूवारी बाळेवाडी रोडला सुनील मंडले याच्यासह विष्णू मंडले, लायन मंडले, रमेश मंडले सायंकाळी व्यायामासाठी गेले होते. यावेळी वरीलपैकी काही मंडळी हुन्डाई क्रेटा गाडीसह तेथे उपस्थित होते.

तेथे व्यायामासाठी गेल्यानंतर विष्णू मंडलेसह इतरांना धीरज पाटील व सहकाऱयांनी रॉडसह काठय़ांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. मारहाणीचा हा प्रकार शेटफळे चौकापर्यंत सुरू होता. त्यावेळी तेथे उपस्थित मंडले समाजातील काही मंडळींना मारहाण करून जखमी करण्यात आले. एकाचवेळी जमावाने मारहाण करून दहशत माजविण्याचा प्रकार घडल्याने करगणीत खळबळ माजली. या मारहाणीतील जखमींना तातडीने आटपाडीमध्ये तसेच सांगलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. सांगलीत दाखल असलेल्यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, दोन समाजामध्ये तरूणांच्या किरकोळ भांडणाचे पर्यवसन मोठय़ा मारहाणीमध्ये घडल्याने ऐन निवडणुकीत करगणीचे वातावरण तणावग्रस्त बनले आहे.