|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इस्लामिक स्टेटच्या पतनानंतर इराकमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक

इस्लामिक स्टेटच्या पतनानंतर इराकमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक 

बूश यांच्यावर बूट फेकणारा पत्रकार निवडणुकीच्या मैदानात

  वृत्तसंस्था/ बगदाद

 इस्लामिक स्टेटच्या पतनाच्या  इराकमध्ये  पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक होतेय. 329 सदस्यीय संसदेसाठी यंदा सुमारे 7 हजार उमेदवार उभे आहेत. 2008 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर बूट फेकणाऱया इराकी पत्रकार मुंतजर अल-जैदीचा यात समावेश आहे. इराकमध्ये 9 महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर जैदी आता खासदार होऊन देशसेवा करू इच्छितो.

आपण पंतप्रधान किंवा अध्यक्ष झालो, तर भारतासोबतचे संबंध वृद्धिंगत होण्यास प्राधान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात अत्यंत लोकप्रिय असून ते देशाला यशाच्या मार्गावर नेतील अशी अपेक्षा आहे. भारत आणि इराण दोन्ही देशांदरम्यान अनेक समानता आहेत. इतिहासात दोन्ही देशांनी साम्राज्यवादाच्या विरोधात संघर्ष केल्याचे विधान जैदी याने केले.

अमेरिकेचा दोष

इराकमध्ये 2003 मध्ये अमेरिकेने हल्ला चढवून सद्दाम हुसेन यांची सत्ता संपुष्टात आणली होती. तेव्हापासून आतापर्यंत इराकमध्ये होणारी ही चौथी सार्वत्रिक निवडणूक आहे. इराकच्या नागरिकांवर करण्यात आलेल्या अन्यायासाठी आपण अमेरिकेला अधिकृत माफी मागण्यास सांगू. इराकच्या स्थितीसाठी केवळ जॉर्ज बुश जबाबदार असल्याचा आरोप जैदीने केला.

युद्धानंतर चौथी सार्वत्रिक निवडणूक

2003 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराकमध्ये आतापर्यंत 3 निवडणुका झाल्या आहेत. 2005 च्या नंतर 2010 आणि 2014 मध्ये लोकांनी मतदान करत इराकच्या इस्लामिक दवा पक्षाला सत्ता सोपविली. इराकचे विद्यमान पंतप्रधान हैदर अल-अबादी सप्टेंबर 2014 पासून सत्तेवर आहेत. हैदर अल-अबादी यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली, त्याच काळात इराकमध्ये इस्लामिक स्टेटचा कब्जा वाढत होता. आयएसचा एकेकाळी इराकच्या 46 टक्के भूभागावर प्रभाव होता. परंतु सरकारचे प्रयत्न, अमेरिका, शिया आणि कुर्दिश सैन्यामुळे देशाच्या मोठय़ा भूभागावर नियंत्रण मिळविणे आणि आयएसला हुसकावून लावण्यास अबादी यशस्वी ठरले.

मलिकी विरुद्ध अबादी लढत

या निवडणुकीत माजी पंतप्रधान नूरी अल-मलिकी आणि विद्यमान पंतप्रधान हैदर अल-अबादी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मलिकी 2006-2014 पर्यंत इराकचे पंतप्रधान राहिले आहेत. त्यांच्यावर सुन्नी मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप झाला होता. आयएसच्या उदयामुळे मलिकी यांच्या जनविरोधी धोरणांना जबाबदार मानले जाते.

25 टक्के जागा महिलांसाठी राखीव

इराकच्या संसदेत 25 टक्के जागा केवळ महिलांसाठी राखीव आहेत. महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने मध्यपूर्वेतील हा महत्त्वाचा पुढाकार मानला जातो. यंदा 2600 महिलांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. किमान 83 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.

शेजारी देशांची भूमिका

इराकच्या निवडणुकीत शेजारी देशांची भूमिका महत्त्वाची ठरेल. आयएसला हुसकावून लावण्यासाठी अनेक देशांनी इराकला मदत केली होती. यात इराण आणि सौदी अरेबियाचा देखील समावेश आहे. दोन्ही देशांनी सैन्य आणि शस्त्रास्त्रांद्वारे इराकच्या सैन्याला मदत पुरविली होती. या दोन्ही देशांसोबतच अमेरिकेचा देखील इराकमध्ये दीर्घकाळापासून मोठा प्रभाव राहिला आहे.