|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नववधूचे बोहल्यावर चढण्याआधी मतदान

नववधूचे बोहल्यावर चढण्याआधी मतदान 

वार्ताहर/ निपाणी

लग्नसोहळा म्हणजे जीवनातील एक अविस्मरणीय सोहळा. जीवनात नवे नाते जोडणारा हा सोहळा प्रत्येकजण आपल्या पद्धतीने साजरा करतो. अशावेळी दुसरे काहीच सूचत नाही हा सर्वांचाच अनुभव आहे. असे असताना निपाणीत न्यू हुडको कॉलनीत राहणाऱया पल्लवी सर्जेराव जाधव या नववधूने बोहल्यावर चढण्याआधी आपण एक सुज्ञ भारतीय आहोत. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीने दिलेला सन्मान आहे, हे लक्षात घेऊन समाजापुढे मतदानाचे महत्त्व पटवून देत प्रथम मतदानाचा हक्क बजावला. यामुळे पल्लवीच्या कर्तव्य दक्षतेबद्दल कौतुक होत आहे.

संगणक अभियंता असणाऱया पल्लवीचा विवाह 12 रोजी कोल्हापूर येथे डॉक्टर असलेल्या हार्दिक यांच्याशी निश्चित करण्यात आला होता. मोरया मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित या विवाह सोहळय़ात नववधू-वरांवर दुपारी 12.29 वाजता अक्षतारोपण होणार होते. या सोहळय़ाच्या निमित्ताने पल्लवीच्या घरात एकच लगबग सुरू होती. अक्षतारोपण सोहळय़ाला जाण्यासाठी जमलेल्या पै-पाहुणे, मित्र परिवार या सर्वांची धावपळ सुरू असतानाच पल्लवी देखील विवाहाचा पेहराव करून सज्ज झाली. आईने नवजीवन सुरू करण्यासाठी दृष्टही काढली.

कोल्हापूरला वऱहाडी जाण्याच्या तयारीत असतानाच पल्लवीने मी, प्रथम मतदानाचा हक्क बजावणार. मगच लग्नाच्या बोहल्यावर चढणार असे सांगितले. बुथ 226 या मतदान केंद्रावर जाताना आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावला. नववधूने मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावताच सर्वजण अवाक झाले. पण त्याचबरोबर मतदानाची जागृती केल्याबद्दल पल्लवीचे कौतुकही केले. शासन निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. यात आयोगाला यशही येत आहे. पल्लवीने बजावलेला मतदानाचा हक्क याचेच प्रतिक आहे. पल्लवीप्रमाणेच सर्व मतदारांनी जागृत होताना मतदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.