|Thursday, April 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पाकचा नापाक चेहरा…

पाकचा नापाक चेहरा… 

दहशतवादाचा पोशिंदा पाकिस्तान करुन सवरुन ‘मी नाही त्यातला’ असा आव आणणारा कुख्यात देश म्हणून ओळखला जातो. या पाकडय़ांचे दात घशात घालायचे काम पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केले आहे. त्यांनी भारतातील 26।11 हल्ल्यामागे पाकिस्तान व पाकिस्तानी संघटना होत्या अशी स्पष्ट कबुली दिली आहे आणि ती पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राला विशेष मुलाखत देऊन दिली आहे. शरीफ यांच्या स्पष्टोक्तीने पाकिस्तानचा नापाक चेहरा आणि मुखवटा उघडा पडला आहे. जगभर सर्वात भीषण समस्या म्हणून दहशतवादाकडे पाहिले जाते. दहशतवाद हा मानवतेला कलंक आहे. शांतता, सुव्यवस्थेला सुरुंग आहे आणि मानवी प्रगतीला व मानवतेला सर्वात मोठा अडथळा आहे. जगभर काही संघटनांनी दहशतवाद माजवला आहे. निरपराध लोकांचे प्राण घेणे, त्यांना ओलीस ठेवणे, धर्माच्या नावाखाली अधर्म पसरवणे, स्त्रियांवर अत्याचार करणे, लुटालूट करणे, अपहरण करणे, स्फोटकांचा वापर करणे, घुसखोरी करणे, बॉम्बस्फोट करणे असे सारे उद्योग या संघटना व त्यांचे पोशिंदे संकुचित स्वार्थासाठी करतात हे वारंवार दिसून आले आहे. हिंदुस्थानात नरेंद्र मोदी सत्तारुढ झाल्यावर मोदींनी आपल्या या शेजाऱयाला तसे उत्तर दिलेच आहे. प्रसंगी सर्जीकल स्ट्राईक करुन पाकिस्तानचे कंबरडे मोडायला कमी केलेले नाही. जगभर अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची शांतता, सहिष्णुतेची भूमिका मांडताना पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर ठेवला आहे. पाकिस्तानच्या दहशतवादाची नखे केवळ भारताला ओचकारत होती तोपर्यंत तोंड बंद ठेऊन शांत असलेले जग आणि आता पाकिस्तानमधील शरीफ यांच्यासारखे दहशतवादाच्या लाथा खाल्लेले लोक समोर येऊन सत्य बोलू लागले आहेत. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे हे जगाला आता मान्यच करावे लागेल आणि सर्व जागतिक समूहाने एका मनाने, एक शक्तीने दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. सन 2008 च्या 26।11 तारखेला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला. त्यामध्ये ताज हॉटेलमध्ये आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांनी एके 47, आरडीएक्स आणि ग्रेनेड सारखी सैनिकी स्फोटके वापरुन भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशत माजवली होती. या हल्ल्यात जवळजवळ 166 जण ठार झाले तर हजारभर जखमी झाले. काही वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले. छत्रपती शिवाजी टर्मिनस, ओबेरॉय, ताज हॉटेल, नरीमन हाऊस, कामा हॉस्पिटल, मेट्रो सिनेमा हा सारा परिसर पाक प्रशिक्षित अतिरेक्यांनी दहशत माजवत अंदाधुंद गोळीबार करत ताब्यात घेतला होता. अजमल कसाब हा अतिरेकी जिवंत पकडला गेला. बाकी साऱयांना मुंबई पोलीस आणि सेनादलाने कंठस्नान घातले. मुंबईवरील 26।11 च्या आठवणी म्हणजे थरकाप आहे. दहशतवादाच्या अति क्रूर चेहऱयाचे दर्शन आहे. अजमल कसाबला पोलिसांनी बोलते केले आणि न्यायालयासमोर त्याची चौकशी होऊन त्याला फाशी देण्यात आली, तेव्हा पाकिस्तान उघडे पडले. लादेन असो, पॅरिसमधील हल्ला असो, श्रीलंका क्रिकेट टीमवरचा हल्ला असो अथवा अमेरिकेतील हल्ला असो, सिरिया कतारमधील दहशत असो, त्यामागे जे दशहतवादी तोंड असते त्याला पाकिस्तानचे कनेक्शन असतेच असते आणि आता तर पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कबुली दिली आहे. भारताने ठोस पुरावे व कागदपत्रे देऊनही पाकिस्तानने दुर्लक्ष केले अशी कबुली देऊन त्यांनी पाकिस्तानचे थोबाड फोडले आहेच. जोडीला पाकिस्तानमधील अराजक स्थितीही पुढे आणली आहे. शरीफ म्हणजे कुणी महापुरुष नव्हे त्याच माळेतले गणंग आहेत पण, आता त्यांनाच लाथा पडल्याने त्यांच्या तोंडातून सत्य पुढे आले आहे. शरीफ यांना पनामा पेपर प्रकरणात दोषी ठरवून पदच्युत करण्यात आले आहे. या दरम्यान त्यांनी डॉनला जी मुलाखत दिली आहे त्यात हाफीज सईद, मसूद अझर किंवा जैशे ए मोहम्मद, जमाद-उद-दला यांचे नाव घेतलेले नसले तरी त्यांचा अराष्ट्रीय घटक असा उल्लेख करुन शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये दोन ते तीन समांतर शक्ती आहेत. तीन समांतर शक्ती देश चालवू शकत नाहीत, असे म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कर, सरकार व धर्मांध अतिरेकी याकडे शरीफ यांनी दाखवलेले बोट दिशादर्शक आहे. भारत-पाकिस्तानला पुरता ओळखून आहे. भारताने जशास तशी भूमिका घेतली आहे. भारतात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले होतात या भारतीय भूमिकेला शरीफ यांच्या मुलाखतीने जागतिक मंचावर बळ आले आहे. पाकिस्तानची उरलीसुरली प्रतिमाही धुळीस मिळाली आहे. आम्हीच पाकिस्तानी दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवले, जाऊ दिले व मुंबईवर हल्ला घडवून आणला, हे त्यांचे शब्द पाकिस्तानच्या नापाक इराद्यावर प्रकाशझोत टाकणारे आहेत. पाकिस्तान कोडगे आहे. निषेध, छी थू, टीका यांचे त्यांना सोयरसुतक नाही. त्यांना जशास तसे ही भाषा समजते आणि मोदी त्यामध्ये तरबेज आहेत. या कबुली जबाबाचा आधार घेत दहशतवादी राष्ट्र म्हणून आंतराराष्ट्रीय पातळीवर पाकला उघडे पाडले पाहिजे आणि धडाही शिकवला पाहिजे. मुंबईचा हल्ला आणि घुसखोरी, जोडीला सीमेवर टेहळणी-गोळीबार व सतत कुरबुरी करणारा हा शेजारी काय अवस्थेत आहे हे या निमित्ताने उघड झाले आहे. आपल्या शेजारी पेटता निखारा आहे याची सतत जाणीव व अखंड सावध असे धोरण घ्यायला हवे. हिंदुस्थानची प्रगती आणि जगभर चमचमणारी प्रतिमा या शेजाऱयाला सहन होईलच असे नाही. शरीफ यांना अजून बोलते केले पाहिजे आणि पाकिस्तानचा दहशतवाद निपटून काढला पाहिजे. मुंबईवरील हल्ल्याला दहा वर्षे झाली. कसाबला शिक्षा झाली. पण, बाकी गुन्हेगार निवांत आहेत. त्यांना व त्यांच्या दहशतवादाला जबर अशी शिक्षा झाली पाहिजे. मोदींना आता नव्याने काही सांगण्याची गरज नाही.

Related posts: