|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मदर्स डे दिवशीच मातेची चिमुकलीसह आत्महत्या

मदर्स डे दिवशीच मातेची चिमुकलीसह आत्महत्या 

प्रतिनिधी/ सांगली

 आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा मदर्स डे सर्वत्र साजरा केला जात असतानाच रविवारी मदर्स डे दिवशीच एका वीस वर्षीय विवाहितेने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. रविवारी सकाळी विकासनगर येथे महापालिकेच्या खुल्या भुखंडावर असणाऱया विहिरीतून दोघींचेही मृतदेह काढण्यात आले. तर मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे.

 सौ. पूजा राजेश चौगुले (वय 20) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून सृष्टी या साडेतीन वर्षे वयाच्या मुलीसह तिने आत्महत्या केली आहे. पती व सासूने दुचाकीसाठी पेलेला छळ असहय़ झाल्याने आपल्या मुलीने नातीसह आत्महत्या केल्याची तक्रार मृत पूजा हिच्या आईने दिली आहे. त्यानुसार पती व सासूला संजयनगर पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली.

 याबाबत माहिती अशी, कर्नाटकातील सदलगा येथील चौगुले कुटुंब विकासनगर येथील बाटल्याच्या कारखान्याजवळ गेल्या एक वर्षापासून भाडय़ाने राहत होते. पूजाचे पती राजेश हा सेंट्रींग कामगार होता. तर चिक्कोडी तालुक्यातील नेज हे पूजाचे माहेर होते. 2012 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगीही झाली होती. शनिवारी रात्री पूजा चिमुकल्या सृष्टीसह गायब झाली होती. पती आणि आईने रात्रभर शोधाशोध केली. पण, त्या दोघीही सापडल्या नाहीत. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विकासनगर येथील महापालिकेच्या खुल्या भुखंडावरील विहिरीत मृतदेह तरंगताना आढळला.

  संजयनगर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. जीवरक्षक पथकाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पण, मृत पूजा हिची आई संगीता आनंदा दाभाडे (वय 45 रा. नेज ता. चिक्कोडी) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. लग्नावेळी पूजाचे पती राजेशला दुचाकी देण्याचे मान्य केले होते. पण ती न दिल्याने सासू लक्ष्मी उर्फ बाळुबाई मिलन चौगुले आणि पती राजेश मिलन चौगुले यांनी तिचा छळ सुरू केला होता. तिला उपाशी ठेवणे, सतत मारहाण करणे असे प्रकार सुरू केले होते. पती आणि सासूकडून होणारा त्रास सहन न झाल्यानेच तिने चिमुकल्या मुलीसह आत्महत्या केल्याची तक्रार सौ. संगीता दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत केली आहे.

 पोलिसांनी सौ. लक्ष्मी दाभाडे (वय 45) आणि राजेश चौगुले (वय 29) या दोघांना रविवारी रात्री उशीरा अटक केली आहे. शहर पोलीस उपाधीक्षक अशोक वीरकर तपास करीत आहेत. कौटुंबिक वादातून टोकाचा निणय घेत  मातृदिनादिवशीच मातेने चिमुकलीसह जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.