|Friday, April 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मंगळाला कडी?

मंगळाला कडी? 

आपल्या पृथ्वीला एक उपग्रह आहे, त्याला आपण चंद्र म्हणतो. उद्या समजा हा चंद्रच नाहीसा झाला तर? अजून तरी तशी शक्यता दिसत नाही. पण मंगळाच्या बाबतीत अशी शक्यता खगोलविदांना वाटू लागली आहे. त्याचा आणि मंगळाला कडी असण्याचा जवळचा संबंध आहे, असंही या वैज्ञानिकांना वाटतं. सध्या मंगळाला दोन उपग्रह आहेत. फोबॉस आणि डीमॉस ही त्यांना आपण दिलेली नावं. यातला फोबॉस हा उपग्रह अल्पायुषी आहे, असं खगोलशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. अर्थात अल्पायुषी ही संज्ञा विश्वाच्या वयसापेक्ष आहे. जेव्हा आपण वैश्विक गोष्टींबद्दल विचार करतो. त्यावेळी पाच दहा कोटी वर्षे हा काळ फार किरकोळ असतो.

फोबॉस हा मंगळाच्या दोन उपग्रहांपैकी मोठा उपग्रह. तो डीमॉसपेक्षा मंगळाच्या जवळ आहे. हीच जवळीक त्याला नडणारी आहे. फोबॉस हळूहळू मंगळाच्या अधिकाधिक जवळ चालला आहे. त्याची कक्षा आक्रसते आहे. त्याचा परिणाम फोबॉसला फारच महागात पडणारा आहे, हे खगोल शास्त्रज्ञांना गेली बरीच वर्षे माहीत आहे. फोबॉस एक दिवस ही जवळीकीची मर्यादा ओलांडेल, त्यावेळी मंगळाचे गुरुत्वाकर्षण त्याला झपाटय़ान्ंाs जवळ खेचेल. त्याचे तुकडे व्हायला सुरुवात होईल. फोबॉस फुटेल. फोबॉस फुटला की जे डबर निर्माण होईल त्यांचे आणखी बारीक बारीक तुकडे होऊ लागतील. मोठमोठे टेकडीएवढाले धोंडे, छोटे धोंडे आणि अगदी बारीक रेती आणि धुलीकण हे फोबॉसचे अवशेष मंगळाभोवती फिरू लागतील. वायुरूप राक्षसी ग्रहांप्रमाणेच मंगळाभोवतीही कडी निर्माण होतील. हे आजपासून अडीच कोटी वर्षानंतर घडायला हरकत नाही. पण कदाचित हे घडायला आणखी काही काळ लागेल, पण साडे सात कोटी वर्षेही फोबॉसच्या आयुष्याची अखेरची मर्यादा असेल, असं म्हटलं जातं होतं. पण अलीकडच्या काळात जी निरीक्षणं केली गेली, त्यातून फोबॉसच्या जडणघडणीची आणि घनतेची बरीच माहिती खगोलशास्त्रज्ञांच्या हाती आली आहे, त्या माहितीनुसार फोबॉसचा अंतकाल हा कदाचित आणखी जवळ येऊन ठेपलेला आहे.

मंगळाच्या ज्या तुकडय़ांना त्याच्या भोवतीच्या कडय़ांमध्ये सामावून घेतलं जाणार नाही ते शीलाखंड मंगळावर आदळतील. त्यांची धड चांगलीच बलशाली असेल, त्या धडकेमुळे मंगळावर मोठमोठे खड्डे निर्माण होतील. त्यांच्यामुळे पूर्वी देवीचे व्रण असायचे तसा मंगळाचा पृष्ठभाग दिसू लागेल. ‘खगोल शास्त्राचा अभ्यास करताना भूतकाळात काय घडलं, या गोष्टीचा तसंच सध्या काय घडतंय, याचा विचार केला जातो. आम्ही खगोल अभ्यासक अगदी क्वचितच भविष्यात काय घडणार आहे, याचा विचार करतो,’ असं बेंजामिन ए. ब्लॅक म्हणतात. ब्लॅक हे न्यूयॉर्क विद्यापीठात खगोलशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांचा विद्यार्थी तुषार मित्तल बर्कले इथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधन करतो. या दोघांनी मिळून फोबॉसच्या भवितव्याबद्दल सविस्तर आणि खोलवर संशोधन केलंय. त्यांच्या मते फोबॉस फुटण्याची प्रक्रिया खरं तर सुरू झालेली असून,  त्याचे पुरावे व्हायकिंग मोहिमेतच हाती येऊ लागले होते. आता इतर मानवी शोध मोहिमांमधील मानवी उपग्रहांनी त्या छोटेखानी उपग्रहाच्या पृष्ठभागाच्या ज्या प्रतिमा पृथ्वीवर पाठवल्या आहेत. त्या प्रतिमांमध्ये या मंगळाच्या उपग्रहाच्या पृष्ठभागावरचे तडे स्पष्टपणे दिसू लागले आहेत, असं हे दोन खगोल शास्त्रज्ञ म्हणतात. 

इ. स. 2015 मध्ये नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये काम करणाऱया टेरी हार्ट फोर्ड आणि त्याच्या सहाध्यायांनी या तडय़ांचं नव्यानं पृथक्करण केलं. त्यातले बरेच तडे हे फोबासच्या सतत मंगळाकडे असणाऱया पृष्ठभागावरून चहुबाजूस पसरले आहेत. हे या पृथक्करणात सिद्ध झालं. मंगळाच्या गुरुत्वाकर्षणामुळं फोबॉसच्या पृष्ठभागावर जो दबाव वाढतो, त्याम़ुळे फोबॉसचं विकृतीकरण होत चाललं आहे, असं दिसतं.

मंगळाचा फुटू पाहणारा उपग्रह फोबॉस हा तसा आकारानं लहान आहे. त्याचा साक्षीदार डीमॉस त्याचा व्यास जेमतेम 12.6 कि. मी. आहे. त्याची सरासरी कक्षा 23 हजार 450 कि. मी. एवढी आहे. त्यामुळे त्याची अवस्था फोबॉससारखी होणार नाही. फोबॉसचा व्यास 22.2 कि. मी.आहे. तो मंगळाभोवती सरासरी 9377 कि. मी. अंतरावरून फिरतो. त्याला मंगळाभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 7 तास 39 मिनिटे आणि काही सेकंद लागतात. फी बॉसचं आणखी एक वैशिष्टय़ आहे. आपल्या सूर्याच्या ग्रहमालेतील ग्रहांभोवती एकूण 181 ज्ञात उपग्रह आहेत. त्यातले फक्त 18 उपग्रह त्यांच्या मूळ ग्रहाच्या स्वतःभोवती फिरण्याच्या म्हणजे स्वांगपरिभ्रमणाच्या वेळेपेक्षा कमी वेळात त्यांच्या ग्रहाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. फोबॉसचे तुकडे होण्यामागचं ते एक कारण आहे. फोबॉसच्या नष्ट होण्यामागे आणखी तीन कारणंही आहेत, असं तुषार मित्तल म्हणतो. मंगळाचं आकर्षण, फोबॉसवरील केंद्रोत्सारी प्रेरणा, फोबॉसचं स्वतःचं गुरुत्वाकर्षण आणि फोबॉसची दुर्बलता. या सर्वात सध्या एक प्रकारचा समतोल साधला जात आहे. मंगळाचं गुरुत्वाकर्षण आणि फोबॉसच्या स्वतःभोवती फिरण्यामुळं निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा या परस्परविरोधी बलांमुळे फोबॉस ताणतणावाखाली असतो. तर फोबॉसचं गुरुत्वाकर्षण आणि ताण यामुळे फोबॉस एकसंधपणे टिकून आहे. ज्याप्रमाणे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे सागरात आणि भूपृष्ठावर लाटा निर्माण होतात. त्याच प्रमाणे फोबॉसच्या गुरुत्वाकर्षणामुळं मंगळाच्या पृष्ठभागावर अगदी अल्प असा परिणाम हा होतोच. फोबॉस मंगळाभोवती फिरताना तो ज्या भागावर असेल त्या पृष्ठावर एक फुगवटा निर्माण होतो आणि तो फोबॉसबरोबर सरकत राहतो. पण फोबॉस हा मंगळाच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीपेक्षा अधिक वेगाने फिरत असल्यामुळे फोबॉस बरोबरीनं हा फुगवटा पुढं सरकू शकत नाही. त्यामुळं फोबॉसच्या गतीवर परिणाम होतो. फोबॉसची गती दरवर्षी दोन से. मी. नं कमी होते. यामुळं हळुहळू फोबॉस मंगळाच्या जवळ येऊ लागला आहे. जसाजसं  मंगळ आणि फोबॉसमधलं अंतर कमीत कमी होतंय तसतसा दोघांच्याही गुरुत्वाकर्षणाचा परस्परांवरील परिणाम हा वाढत चालला आहे. फोबॉसचं गुरुत्वाकर्षण  आणि ताण उदबल हे मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम कमी करायचा प्रयत्न करतात. पण एक दिवस असा येईल जेव्हा फोबॉस मंगळाच्या इतका जवळ येईल की त्याची ताण सहन करण्याची सहन शक्ती संपेल, या जवळ येण्याच्या मर्यादेला रोझ मर्यादा म्हणतात. ही एक प्रकारची नैसर्गिक लक्ष्मणरेषा ओलांडली की मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचा विजय होईल. त्यामुळं आणखी अडीच कोटी ते साडे सात कोटी वर्षाच्या दरम्यान फोबॉसचं नष्टचर्य सुरू होईल.  तुषार मित्तल यांच्याप्रमाणेच इतरही काही खगोल शास्त्रज्ञांनी अभ्यास करून असेच निष्कर्ष काढलेले आहेत.

Related posts: