|Sunday, August 25, 2019
You are here: Home » क्रिडा » हॅनोव्हरमधील स्पर्धेत हीनाला सुवर्ण, निवेताला कांस्य

हॅनोव्हरमधील स्पर्धेत हीनाला सुवर्ण, निवेताला कांस्य 

वृत्तसंस्था/ हॅनोव्हर

भारतीय महिला नेमबाज हीना सिद्धूने हॅनोव्हर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण तर पी. श्री निवेताने कांस्यपदक पटकावले. 

अंतिम फेरीत हीनाने चमकदार प्रदर्शन करीत फ्रान्सच्या माथिल्डे लॅमोलशी 239.8 गुण घेत बरोबरी साधली हाती. टायब्रेकरमध्ये हीनाने बाजी मारत सुवर्ण पटकावले. श्री निवेताने 219.2 गुण घेत कांस्य मिळविले. पुढील आठवडय़ात आयएसएसएफ म्युनिच विश्वचषक नेमबाजी स्पर्धा होणार असून त्याची जोरदार तयारी केल्याचे हीनाने येथील येथील स्पर्धेत दाखवून दिली. हीनाने प्रारंभीच्या मालिकेत 9 गुणांची नोंद केल्यानंतर कामगिरी आणखी उंचावत 10 व त्याहून अधिक गुण मिळविले. दुसऱया मालिकेत तिने सलग 10 गुण घेण्याचा सपाटला लावला आणि एलिमिनेशन फेरीत तिने 10.9 असे परिपूर्ण गुण नोंदवत सुवर्णपदकाच्या फेरीत झेप घेतली.

सुरुवातीला तिसऱया-चौथ्या स्थानासाठी संघर्ष करावा लागल्यानंतर 13 व्या शॉटमध्ये तिने 10.9 गुणांचा नेम साधत अंतिम फेरीत आघाडी मिळविली आणि अखेरपर्यंत कायम राखत तिने सुवर्ण पटकावले. 572 गुण घेत तिने चौथे स्थान घेत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती तर निवेता पात्रता फेरीत 582 गुणांसह अग्रस्थान घेतले होते. वर्ल्ड कपसाठी आपली तयारी योग्य दिशेने होत असल्याचे हीनाने नंतर सांगितले. म्युनिच वर्ल्ड कप स्पर्धा 22 ते 29 मे या कालावधीत होणार असून हीनाची ही या वर्षातील दुसरी मोठी स्पर्धा असेल. अलीकडेच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तसेच कोरियातील वर्ल्ड कप स्पर्धेत दुहेरी पदके पटकावली होती. तिने 25 मी. पिस्तुल नेमबाजीत सुवर्ण व 20 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत रौप्यपदक मिळविले होते.