|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दोन दिवसात आचारसंहिता उठणार

दोन दिवसात आचारसंहिता उठणार 

प्रतिनिधी/ सांगली

पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हाभर लागू करण्यात आलेली आचारसंहिता उठण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांचे अर्ज सोमवारी मागे घेण्यात आले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तसा अहवाल तात्काळ निवडणूक आयोगाकडे पाठवला असून दोन दिवसात जिह्यातील आचारसंहिता उठण्याची शक्यता आहे. यामुळे रखडलेल्या कोटय़वधी रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण जिह्यात आयोगाने आचारसंहिता लागू केली होती. त्यामुळे मनपा क्षेत्रासह जिह्याच्या ग्रामीण भागातील विकासकामांवर याचा मोठा परिणाम झाला होता. कोटय़वधी रुपयांची विकासकामे रखडली होती. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी आचारसंहीता शिथील करण्याची मागणी केंद्रिय निवडणूक आयोगाकडे केली होती. याबाबतचा निर्णय केंद्रिय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता.

दरम्यान, काँग्रेसने कदम यांचे पुत्र डॉ. विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निवडणूक लागण्याचे संकेत मिळत होते. मात्र सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यासह अन्य अपक्ष उमेदवारांनीही त्यांचे अर्ज माघारी घेतल्याने डॉ. विश्वजित कदम यांची बिनविरोध आमदार म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, पलूस-कडेगावची निवडणूक बिनविरोध झाल्याचा अहवाल केंद्रिय निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन दिवसात आचारसंहितेबाबत निर्णय होईल.