|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘शाळा आमची.. शिक्षक कित्या भायलो?’

‘शाळा आमची.. शिक्षक कित्या भायलो?’ 

डी. एड, बी. एड बेरोजगारांनी आंदोलनाचा दुसरा दिवस गाजवला

प्रतिनिधी / ओरोस:

शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के प्राधान्य द्या आणि भरती परीक्षेतील गुण वाढवून देणाऱया रॅकेट कारवाई करा, या मागणीसाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आंदोलनकर्त्यांनी विडंबन गीतांनी गाजवला. ‘शाळा आमची, पोरा आमची, शिक्षक कित्याक भायलोयासारखी मालवणी भाषेतील गाणी आणि शिक्षक भरतीबाबतची विडंबन गीते यावेळी सादर करण्यात आली. आंदोलनाची दखल घेतली गेल्यास बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मागील आठ वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती झालेली नाही. त्यातच भरती प्रक्रिया परीक्षेत गुण वाढवून देणारे रॅकेट असल्याने अनेक डी. एड, बी. एड. उमेदवारांवर अन्याय झाला असून जिल्हय़ातील सुमारे अडीच हजार उमेदवारांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळली आहे. त्यामुळे या रॅकेटचा बंदोबस्त करावा, परजिल्हय़ातील उमेदवारांचे आयात धोरण बदलून स्थानिकांना भरतीत 70 टक्के प्राधान्य देणारा धोरणत्मक निर्णय घ्यावा, आदी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत. या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा डी. एड, बी. एड बेरोजगार संघटनेने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून तीन दिवसांचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तसेच माध्यमिक शिक्षक संघटनेने या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे..

शिक्षकाची व्यावसायिक पात्रता धारण केलेल्या डी एड. बी. एड उमेदवारांना आता टीईटीसारख्या अभियोग्यता चाचण्यांची सक्ती करून केवळ भरती प्रक्रियेचे वेळकाढू धोरण शासनाने चालवले आहे. त्यातच या चाचण्यांमधून मिळणारे गुण वाढवून देणारे रॅकेट स्वतःचे उखळ पांढरे करीत आहे. या रॅकेटमुळे गरीब उमेदवारांवर अन्याय होत आहे. शिवाय ही परीक्षा पास करणाऱयांना नोकरीची कोणतीच हमी नाही. त्यामुळे सगळय़ा बाजूंनी अन्यायाचे धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे या रॅकेटवर कारवाई करावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

जिल्हय़ाचा डोंगराळ भाग आणि बोली भाषेचा विचार करता परजिल्हय़ातील उमेदवारांच्या आयात धोरणात बदल करण्यात यावा. डोंगराळ भागाचे आरक्षण लागू करावे. स्थानिकांना प्राधान्य द्यावे. आंतर जिल्हा बदलीमुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी माजी आमदार परशुराम उपरकर, नकुल पार्सेकर यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. दुसऱया दिवशी माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी भेट देत पाठिंबा दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. जिल्हय़ातील सत्ताधाऱयांपैकी एकानेही या आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप करीत नाराजी व्यक्त करण्यात आली. 70 टक्के स्थानिकांना प्राधान्याच्या मुद्दय़ाला जि. . अध्यक्षांकडूनही योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हय़ातील लोकप्रतिनिधीच अनास्था दाखवत असतील, तर न्याय कोणाकडे मागावा, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा डी. एड, बी. एड धारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भीवसेन मसुरकर, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, लखू खरव, भाग्यश्री नर, कृपाली शिंदे, गणपत डांगी यांच्यासह मोठय़ा संख्येने डी. एड, बी. एड बेरोजगार दुसऱया दिवशीही उपस्थित होते.