|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » मुंबई-पंजाब यांच्यात आज संघर्ष रंगणार

मुंबई-पंजाब यांच्यात आज संघर्ष रंगणार 

वृत्तसंस्था/ मुंबई

आयपीएल साखळी सामन्यात प्ले-ऑफ लढतीत स्थान निश्चित करण्यासाठी चांगलाच संघर्ष रंगत असून आज (दि. 16) यजमान मुंबई इंडियन्स व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात बरीच जुगलबंदी अपेक्षित आहे. यापूर्वी, पहिल्या टप्प्यात काही सलग पराभव स्वीकारावे लागल्यानंतर मुंबईसाठी पहिल्या चारमध्ये पोहोचणे दुरापास्त असेल, असे संकेत होते. पण, नंतर त्यांनी सलग तीन विजय संपादन करत आव्हानात जान भरली. केवळ मागील लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध आठ गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागल्याने ते बॅकफूटवर फेकले गेले. त्याची भरपाई त्यांना आता करावी लागेल. रात्री 8 वाजता या लढतीला सुरुवात होईल.

सध्या गुणतालिकेत मुंबईचा संघ 12 सामन्यात 5 विजयांसह सहाव्या स्थानी असून पंजाबचा संघ 12 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. पंजाबला मागील 5 सामन्यात 4 पराभव स्वीकारावे लागले असून हा त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरला आहे. मुंबईची धावगती सरस असली तरी राजस्थानविरुद्ध स्वीकारलेला पराभव मागे टाकत त्यांना नव्याने आक्रमणावर भर द्यावा लागेल.

मागील लढतीत मुंबईची मध्यफळी तर कोसळलीच. पण, त्याही शिवाय कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर त्याचा खराब फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा ठरला. फलंदाजीच्या आघाडीवर केवळ सुर्यकुमार यादवच सातत्य राखत आला असून इव्हिन लुईस बहरात परतल्यास ही त्यांच्यासाठी किंचीत जमेची बाजू ठरु शकेल. रोहितने आरसीबीविरुद्ध सामना जिंकून देणारी खेळी साकारली होती. पण, नंतर तो कमालीचा अपयशी ठरला आहे. रोहित बहरात परतला आणि हार्दिक व कृणाल या पंडय़ा बंधूंची समयोचित साथ लाभली तरच मुंबईला अपेक्षा करता येईल. खराब गोलंदाजी ही देखील मुंबईची चिंता असून केएल राहुल, ख्रिस गेल यांची स्फोटक फलंदाजी वेळीच रोखायची असेल तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पंडय़ा व मिशेल मॅकक्लॅघन यांना कल्पक गोलंदाजी करावी लागेल.

पंजाबला यापूर्वी आरसीबीविरुद्ध मागील लढतीत अवघ्या 88 धावांवर समाधान मानावे लागले होते. या हंगामातील ती दुसरी सर्वात निचांकी धावसंख्याही ठरली. सर्वोत्तम बहरात असलेला केएल राहुल 21 धावांवर बाद झाल्यानंतर गेल परतला आणि मध्यफळीही तेथे अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. अफगाणचा लेगस्पिनर मुजीब-उर-रहमानला हाताची दुखापत झाल्याने पंजाब संघ चिंतेत असून आजही तो खेळू शकला नाही तर गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने अश्विन व अक्षर पटेल यांच्यावरच असणार आहे.

संभाव्य संघ

किंग्स इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), ख्रिस गेल, ऍरॉन फिंच, केएल राहुल, करुण नायर, मोहित शर्मा, मुजीब-उर-रहमान, बरिंदर सरण, डेव्हिड मिलर, ऍन्डय़्रू टाय, अंकित रजपूत, अक्षर पटेल, आकाशदीप नाथ, मायंक अगरवाल, मायंक अगरवाल, मनोज तिवारी, युवराज सिंग, मार्कस स्टोईनिस, मायंक डगर.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), सुर्यकुमार यादव, इव्हिन लुईस, इशान किशन, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, केरॉन पोलार्ड, मायंक मार्कंडेय, मिशेल मॅकक्लॅघन, मुस्तफिजूर रहमान, जसप्रीत बुमराह, अकिला धनंजया, बेन कटिंग, जेपी डय़ुमिनी, राहुल चहर, शरद लुम्बा, ऍडम मिल्ने, सिद्धेश लाड, मोहम्मद निधेश, मोहसीन खान, अनुकूल रॉय, प्रदीप संगवान, ताजिंदर सिंग, आदित्य तरे, सौरभ तिवारी.

सामन्याची वेळ : रात्री 8 वा.

 

Related posts: