|Wednesday, May 23, 2018
You are here: Home » क्रिडा » कुलदीपच्या चक्रव्युहात राजस्थान रॉयल्स गारद

कुलदीपच्या चक्रव्युहात राजस्थान रॉयल्स गारद 

आयपीएल साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची 6 गडी राखून सहज बाजी

वृत्तसंस्था/ कोलकाता

डावखुरा, रहस्यमय फिरकीपटू कुलदीप यादवने अवघ्या 20 धावातच 4 बळी घेतल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर 6 गडी राखून सहज मात केली. शिवाय, या हंगामातील आयपीएलमध्ये प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले. केकेआरने राजस्थानला 19 षटकात 142 धावांतच गारद केले तर प्रत्युत्तरात 18 षटकात 4 बाद 144 धावांसह विजयावर शिक्कामोर्तब केले.

विजयासाठी 144 धावांचे आव्हान असताना सलामीवीर ख्रिस लिनने 42 चेंडूत सर्वाधिक 45 धावांचे योगदान दिले तर कर्णधार दिनेश कार्तिकने 31 चेंडूतच जलद 41 धावा फटकावल्या. कार्तिकने उत्तूंग षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.

प्रारंभी, सुनील नरेनने अवघ्या 7 चेंडूतच 21 धावांची आतषबाजी करत संघाचे आक्रमक इरादे स्पष्ट केले. त्याने के. गौतमच्या एकाच षटकात 2 चौकार व 2 षटकार खेचत संघाला फ्लाईंग स्टार्ट मिळवून दिला. त्यानंतर तो दुसऱयाच षटकात बाद झाला. पण, त्याच्या आक्रमक फलंदाजीचा कित्ता केकेआरच्या अन्य फलंदाजांनीही गिरवला आणि त्यानंतर राजस्थान रॉयल्सचे आव्हान केव्हाही तोकडेच ठरणार होते.

बेन स्टोक्सने नरेन व रॉबिन उत्थप्पा (4) यांना सलग षटकात बाद करत 15 धावात 3 बळी असे पृथ्थकरण नोंदवले. पण, तोवर कोलकाताने विजयाची भक्कम पायाभरणी केली होती. लिनसह कार्तिकने सहजसुंदर फटकेबाजी करत पुढे औपचारिकता पार पाडली.

या विजयासह केकेआरने प्ले-ऑफसाठी आपले आव्हान कायम राहील, याची पुरेपूर काळजी घेतली. सध्या त्यांच्या खात्यावर 13 सामन्यातून 14 गुण असून गुणतालिकेत ते तिसऱया स्थानी विराजमान आहेत. राजस्थान रॉयल्सचा संघ 13 सामन्यात 12 गुणांवर असून इथून पुढे त्यांच्यासाठी प्ले-आफ गाठणे तांत्रिकदृष्टय़ा कठीणच असणार आहे.

कुलदीपचे 4 बळी

तत्पूर्वी, कुलदीप यादवच्या स्वप्नवत स्पेलच्या बळावर केकेआरने राजस्थानचा डाव सर्वबाद 142 धावांवर संपुष्टात आणला. वास्तविक, राजस्थानने 4 षटकात बिनबाद 59 अशी आक्रमक सुरुवात केली होती. पॉवरप्लेमधील त्यांची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. पण, मधल्या षटकात त्यांची हाराकिरी फटका देणारी ठरली. अवघ्या 31 धावातच त्यांनी 6 बळी गमावले होते. आठव्या स्थानावर फलंदाजीला उतरलेल्या जयदेव उनादकटने 18 चेंडूत 26 धावांची आतषबाजी केली, ते लक्षवेधी ठरले. एम. प्रसिद्ध कृष्णाने डावातील 19 व्या षटकात त्याची खेळी संपुष्टात आणत राजस्थानचा डावही संपवला.

आठव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या कुलदीपने आपल्या चारही षटकात प्रत्येकी एक बळी घेतला. जोस बटलरची प्राईज विकेटही त्यालाच मिळाली. प्रारंभी त्याने अजिंक्य रहाणेला तर पुढील षटकात बटलरला बाद केले. बेन स्टोक्स व स्टुअर्ट बिन्नी यांनाही त्यानेच डगआऊटचा रस्ता दाखवला होता.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स : 19 षटकात सर्वबाद 142 (जोस बटलर 22 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 39, राहुल त्रिपाठी 15 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 27, जयदेव उनादकट 18 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 26. अवांतर 2. कुलदीप यादव 4 षटकात 20 धावात 4 बळी, आंद्रे रसेल 2-13, एम. प्रसिद्ध कृष्णा 4 षटकात 2/35, शिवम मावी, सुनील नरेन प्रत्येकी 1 बळी).

केकेआर : 18 षटकात 4/144 (ख्रिस लिन 42 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 45, दिनेश कार्तिक 28 चेंडूत 4 चौकारांसह 31, सुनील नरेन 7 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 21, नितीश राणा 17 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 21. अवांतर 2. बेन स्टोक्स 4 षटकात 15 धावात 3 बळी, ईश सोधी 1/21).

Related posts: