|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिल्हय़ात भाजपला 10, काँग्रेसला 8 जागा

जिल्हय़ात भाजपला 10, काँग्रेसला 8 जागा 

प्रतिनिधी / बेळगाव

विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेक प्रस्थापितांना धक्का देणारा ठरला आहे. जिल्हय़ात भाजपला 10 तर काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळाला. दोन्ही पक्षांतील प्रभावी नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. निधर्मी जनता दलाला जिल्हय़ात आपले खाते उघडता आले नाही. मंगळवारी जाहीर झालेला निकाल धक्कादायक असाच असून भाजप व काँग्रेसच्या परिस्थितीत मात्र सुधारणा झाली आहे. बेळगाव उत्तर, दक्षिण मतदारसंघात भाजपचा तर बेळगाव ग्रामीण व खानापूर मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला आहे.

मंगळवारी सकाळी 8 वाजता आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. एकाचवेळी सर्व 18 मतदारसंघांतील मतमोजणी वेगवेगळय़ा इमारतीत सुरू करण्यात आली. दुपारी 1 वाजेपर्यंत बरेचसे चित्र स्पष्ट झाले तरी कोणत्या उमेदवाराने किती मते घेतली, विजयाचे अंतर किती याचा तपशील सायंकाळनंतर उपलब्ध झाला. जिल्हाधिकारी झियाउल्ला एस., जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन आदी वरि÷ अधिकाऱयांच्या देखरेखीखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.

समर्थकांची प्रचंड गर्दी

आरपीडी कॉलेज आवारात व आरपीडी सर्कलजवळ राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम. चंद्रशेखर, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, एस. बी. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मतमोजणी केंद्रांबाहेर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. मेटल डिटेक्टरमधून तपासणी करूनच उमेदवार, मतमोजणी एजंट, अधिकारी व पत्रकारांना केंद्रांवर प्रवेश देण्यात येत होता.

पहिला निकाल सकाळी 11.45 वाजता

पहिला निकाल सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास लागला. चिकोडी-सदलगा मतदारसंघातून काँग्रेसचे गणेश हुक्केरी विजयी झाले. मात्र, प्रत्यक्षात उशिरा हा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर केवळ 10 मिनिटांनी 11.55 वाजण्याच्या सुमारास सौंदत्ती मतदारसंघातून भाजपचे विश्वनाथ मामनी विजयी झाले. मतमोजणीच्या सर्व फेऱया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱयांनी दुपारनंतर हे निकाल जाहीर केले.

सीसीटीव्ही कॅमेऱयांच्या माध्यमातून लक्ष

जिह्यातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्येच झाली. प्रत्येक मतदारसंघात किती फेऱयांतून मतमोजणी करायची, याचे वेळापत्रक आधीच निश्चित करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे निवडणूक अधिकाऱयांनी आपली जबाबदारी पार पाडली. जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. व जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन हे प्रत्येक केंद्रांवरील मतमोजणीवर सीसीटीव्ही कॅमेऱयांच्या माध्यमातून लक्ष ठेवून होते.

निपाणी मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार शशिकला जोल्ले विजयी झाल्या. त्यांना एकूण 87006 मते मिळाली असून काँग्रेसचे काकासाहेब पाटील यांचा त्यांनी 8506 मतांनी पराभव केला. चिकोडी-सदलगा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार गणेश हुक्केरी हे 91467 मते घेऊन 10569 मतांच्या अंतराने विजयी झाले. भाजपचे आण्णासाहेब जोल्ले यांचा त्यांनी पराभव केला.

कागवाडमध्ये श्रीमंत पाटील विजयी

अथणी व कागवाड मतदारसंघातील आपले पारंपरिक बालेकिल्ले राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. अथणीचे विद्यमान आमदार भाजपचे लक्ष्मण सवदी यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे महेश कुमटहळळी यांनी 82094 मते मिळविली आहेत. 2331 मतांच्या अंतराने लक्ष्मण सवदी यांचा पराभव झाला आहे. तर कागवाड मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राजू कागे यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे श्रीमंत पाटील यांनी 83060 मते मिळविली आहेत. 32942 मतांच्या फरकाने या मतदारसंघात काँग्रेस विजयी झाली आहे.

कुडची मतदारसंघात विद्यमान आमदार पी. राजीव यांनी 15008 मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. राजीव यांना 67781 मते मिळाली आहेत. माजी आमदार शाम घाटगे यांचे चिरंजीव अमित घाटगे हे या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला आहे. रायबाग मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार दुर्योधन ऐहोळे 67502 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या प्रदीपकुमार माळगी यांचा 16548 मतांनी पराभव केला आहे.

माजी मंत्री उमेश कत्ती व ए. बी. पाटील हे दोन मातब्बर उमेदवार रिंगणात असल्याने हुक्केरी मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण जिह्याचे लक्ष लागून राहिले होते. भाजपच्या उमेश कत्ती यांनी 83588 मते मिळवून 15385 मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे. तर अरभावी मतदारसंघात माजी मंत्री व भाजपचे विद्यमान आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी 96144 मते घेऊन आपला गड राखला आहे. काँग्रेसचे अरविंद दळवाई व निजदचे भीमाप्पा गडाद यांचा 47328 मतांनी त्यांनी पराभव केला आहे.

 जारकीहोळी बंधू विजयी

गोकाक मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी 90249 मते मिळवून विजय मिळविला आहे. 14280 मतांच्या फरकाने त्यांनी भाजपचे अशोक पुजारी यांचा पराभव केला आहे. तर यमकनमर्डी मतदारसंघात माजी मंत्री व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सतीश जारकीहोळी यांना 2850 मतांच्या फरकाने निसटता विजय मिळाला आहे. सतीश यांनी 73512 मते मिळविली आहेत. या मतदारसंघात भाजपच्या मारुती अष्टगी यांनी निकराची झुंज दिली आहे.

बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनिल बेनके यांनी 79060 मते घेऊन विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार फिरोज सेठ यांचा 17267 मतांच्या फरकाने पराभव केला. तर बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचे अभय पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांना 84498 मते मिळाली आहेत. 58692 मतांच्या फरकाने त्यांनी काँग्रेसचे एम. डी. लक्ष्मीनारायण यांचा पराभव केला आहे. बेळगाव ग्रामीणमध्ये 1,02,040 मते घेऊन काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर या विजयी झाल्या आहेत. भाजपचे विद्यमान आमदार संजय पाटील यांचा 51724 मतांच्या फरकाने त्यांनी पराभव केला आहे.

खानापूर मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर या विजयी झाल्या आहेत. अंजली यांना 36649 मते मिळाली असून भाजपचे विठ्ठल हलगेकर यांचा 5133 मतांनी पराभव केला आहे. कित्तूर मतदारसंघात मामा-भाच्यांच्या भांडणात भाजपचे महांतेश दोड्डगौडर यांनी 73155 मते घेऊन विजय मिळविला. माजी मंत्री व विद्यमान आमदार डी. बी. इनामदार यांचा 32862 मतांनी त्यांनी पराभव केला. बैलहोंगल मतदारसंघात भाजपमध्ये बंडाळी झाली होती. त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला आहे. काँग्रेसचे महांतेश कौजलगी हे 47040 मते मिळवून विजयी झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान आमदार डॉ. विश्वनाथ पाटील यांचा व माजी आमदार जगदीश मेटगुड यांचा त्यांनी पराभव केला.

बंडखोर उमेदवाराला अधिक मते

सौंदत्ती-यल्लम्मा मतदारसंघ राखण्यात भाजपला यश आले आहे. विद्यमान आमदार आनंद मामनी 62480 मते घेऊन विजयी झाले. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारापेक्षाही या मतदारसंघात बंडखोर उमेदवार आनंद चोप्रा यांना अधिक मते मिळाली आहेत. 6251 मतांच्या फरकाने भाजपने आपला गड राखला आहे. तर रामदुर्ग मतदारसंघात विद्यमान आमदार अशोक पट्टण यांचा पराभव झाला आहे. माजी आमदार व भाजपचे उमेदवार महादेवाप्पा यादवाड यांनी 68349 मते घेऊन 2875 मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला.  

सायरन वाजल्याने जिल्हाधिकारी भडकले

मतमोजणी केंद्रावर जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीसीटीव्ही कॅमेऱयांचे फुटेज पाहत होते. त्यावेळी शेजारच्या खोली बाहेरून सायरनचा आवाज आल्यामुळे दोन्ही अधिकारी आपल्या खोलीतून बाहेर धावले. मतमोजणी केंद्रावरील एक कर्मचारी माईक तपासताना सायरनचा आवाज झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी त्या कर्मचाऱयावर पार भडकले.  

Related posts: