|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 66 वर्षांच्या कालखंडानंतर खानापूर तालुक्यावर काँग्रेसचा झेंडा

66 वर्षांच्या कालखंडानंतर खानापूर तालुक्यावर काँग्रेसचा झेंडा 

खानापूर/प्रतिनिधी

खानापूर विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी बाजी मारली. आणि तालुक्यात 66 वर्षांच्या कालखंडानंतर काँग्रेसचा झेंडा फडकला. यापूर्वी म्हणजे मुंबई प्रांतातील 1952 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार बसाप्पण्णा अरगावी विजयी झाले होते. यानंतर एकाही निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी झाला नव्हता. पण यावेळी मात्र म. ए. समितीमधील दुही आणि भाजपातील सुंदोपसुंदीचा लाभ उठवत डॉ. अंजली निंबाळकर यांनी विजय तर मिळविलाच शिवाय खानापूर मतदारसंघात आमदार होणारी पहिली महिला ठरली आहे.

यापूर्वी डॉ. अंजली निंबाळकर यांनी 2013 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी काँग्रेसने डॉ. निंबाळकर यांना उमेदवारी दिली नाही. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तब्बल 17 हजार मते घेतली होती. या पराभवानंतर त्यांनी खचून न जाता गेल्या पाच वर्षात डॉ. अंजली निंबाळकर फौंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून तालुक्यात आपला दबदबा निर्माण केला. तसेच त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नही केले. पण त्यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ नये, यासाठी प्रयत्न करणारी शक्तीदेखील मोठी होती. तरीही त्यांनी पक्षाचे तिकीट मिळविण्यात बाजी मारली. त्यांनी विजय मिळविला खरा, पण त्याला म. ए. समितीमधील गटबाजी तसेच भाजपातील विठ्ठल हलगेकर यांना दिलेल्या उमेदवारीवरून निर्माण झालेली सुंदोपसुंदी यामुळे त्यांना विजय मिळविणे शक्य झाले.

विठ्ठल हलगेकर यांचा केवळ 5500 हजार मतांनी पराभव

 मध्यवर्ती म. ए. समितीने अरविंद पाटलांची तर खानापूर तालुका म. ए. समितीने विलास बेळगावकर यांची उमेदवार म्हणून निवड जाहीर केली. या दोघांनाही मिळालेल्या मतांची बेरीज पाहिल्यास जवळपास 42 हजारपर्यंत मते पोहोचतात. तसेच भाजपच्या काही नेत्यांनी विठ्ठल हलगेकर यांचा प्रचार न करता त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील विठ्ठल हलगेकर यांना 31 हजार मते मिळाली. त्यांचा केवळ 5500 हजार मतांनी पराभव झाला. त्यातच माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांचे चिरंजीव जोतिबा रेमाणी यांनी बंडखोरी केली. याचाही फटका विठ्ठल हलगेकर यांना बसला. कदाचित भाजपच्या काही नेत्यांनी विठ्ठल हलगेकर यांना प्रामाणिक साथ दिली असती तर निवडणुकीचा निकाल कदाचित वेगळाही लागला असता. काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचा विजय झाला आहे. या विजयामुळे ताईंचे आमदार होण्याचे स्वप्न साकार झाले आहे.

तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी

आता तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी ज्या दिवसापासून खानापूर तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात पदार्पण केले, त्या दिवसापासून आपण केवळ आणि केवळ या मागासलेल्या तालुक्याच्या विकासासाठी राजकारणात आली आहे, असे म्हटले होते. या तालुक्याचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास करण्यात त्या निश्चितपणे यशस्वी होतील, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी म्हणजे 2008 साली म. ए. समितीमधील गटबाजीचा लाभ उठवत, भाजप उमेदवार प्रल्हाद रेमाणी यांनी विजय मिळविला होता. योगायोगाने त्यावेळी राज्यातही भाजपची सत्ता आली होती. यावेळी देखील म. ए. समितीमधील गटबाजीचा लाभ उठवत डॉ. अंजली निंबाळकर विजयी झाल्या आहेत. आणि राज्यातही आता निजद-काँग्रेसचे संयुक्त सरकार अधिकारावर येण्याची शक्यता असल्याने त्याचा फायदा निंबाळकर यांना तालुक्याचा विकास घडवून आणण्यास होणार आहे.

Related posts: