|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दहशत माजविण्यासाठी समाजकंटकांचा धुडगूस

दहशत माजविण्यासाठी समाजकंटकांचा धुडगूस 

निवडणूक निकालानंतर शहरात तणाव

बेळगाव / प्रतिनिधी

निवडणुकीच्या निकालानंतर शहर आणि परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशातून काही समाजकंटकांनी धुडगूस घातला. शहराच्या मध्यवर्ती भागातील गल्ल्यांमध्ये तुफान दगडफेक करीत वाहनांची मोडतोड आणि जाळपोळ करण्याचाही प्रकार घडला. समाजकंटकांच्या दगडफेकीत मार्केटचे सीपीआय एस. प्रशांत यांच्यासह अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. सीपीआय एस. प्रशांत यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. अन्य काही जखमींनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत.

निवडणूक निकालाची घोषणा झाल्यानंतर युवकांचे थवे शहर परिसरात मोटारसायकलींवरून फिरून विजयोत्सव साजरा करीत होते. युवकांच्या या विजयोत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न पाटील गल्ली येथे दगडफेकीने सुरू झाला. तेथून पुढे फोर्ट रोड परिसरातही दगडफेक करून युवकांना रोखण्याचा प्रयत्न झाला. या दगडफेकीमध्ये काही युवक जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दंगल माजविण्यासाठी टपलेल्या युवकांनी दगडांचा मारा करून वाहने आणि घरांनाही लक्ष्य बनविले. फोर्ट रोडसह टेंगिनकेरा गल्ली, रविवार पेठ कॉर्नर येथेही दगडफेक करण्यात आली. याच ठिकाणी काही वाहनांवर दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले. या दगडफेकीतून पोलिसांचे वाहनही सुटले नाही. त्याचप्रमाणे टेंगिनकेरा गल्ली येथे एक दुचाकी जाळण्याचाही प्रयत्न समाजकंटकांनी केला. या सर्व प्रकारामुळे शहराच्या काही भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी चव्हाट गल्ली येथे काही निष्पाप युवकांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेतले आहे. शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱया दंगलखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Related posts: