|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गणवेश न मिळताच 35 लाखाचे बिल अदा

गणवेश न मिळताच 35 लाखाचे बिल अदा 

एस. टी. कर्मचाऱयांत नाराजी प्रशासन म्हणतेनुकतेच मिळालेत, पंधरा दिवसांत वाटू!

चंद्रशेखर देसाई / कणकवली:

रा. . महामंडळातर्फे चालक, वाहक, मॅकेनिक, पर्यवेक्षक आदींसाठी गणवेश देण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. जानेवारी 2018 मध्ये प्रातिनिधिक स्वरुपात गणवेशाचे वाटप झाले. मात्र, गणवेश योग्य मापाचे नसल्याने परत करण्यात आले. त्यानंतर चार महिने उलटले तरीही चालक, वाहकांसह संबंधित कर्मचाऱयांना हे गणवेश मिळालेलेच नाहीत. विभाग नियंत्रक कार्यालयाशी संपर्क साधला असता चालक, वाहकांचे गणवेश नुकतेच प्राप्त झाले असून वाटप करण्यास अजून 15 ते 20 दिवस लागतील, असे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे या गणवेशापोटी सिंधुदुर्ग रा. . विभागाला गणवेश शिवून देणाऱया कंपनीने 60 लाखांचे बिल पाठविले असून त्यापैकी सुमारे 35 लाखांहून अधिक रक्कमही देण्यात आल्याचे पुढे आले आहे. एकीकडे रा. . कर्मचाऱयांच्या वेतन करारासाठी पैसे नसताना दुसरीकडे गणवेश प्राप्त होण्याअगोदरच बिले अदा करण्याच्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

रा. . महामंडळाने राज्यात एसटीच्या चालक, वाहक, मॅकेनिक पर्यवेक्षकांसाठी गणवेश देण्याचा उपक्रम हाती घेतला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या सूचनांनुसार राज्यभरात या गणवेश वाटपाचा प्रातिनिधिक कार्यक्रम 6 जानेवारी 2018 मध्ये झाला होता. जिल्हय़ात एसटीचे गणवेश प्राप्त होऊ शकतात, असे सुमारे 1800 च्या जवळपास कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱयांना हे गणवेश मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रातिनिधीक वाटपासाठी 85 गणवेश मागविण्यात आले होते. यापैकी वाटपाच्यावेळी केवळ 20 प्राप्त झाले. या गणवेशाचे ज्या कर्मचाऱयांना वाटप करण्यात आले, त्या कर्मचाऱयांच्या मापाचे गणवेश नाहीत. राज्यभरातही या गणवेशाचे कापड तसेच महिला कर्मचाऱयांना दिलेल्या साडय़ांच्या दर्जाबाबत नाराजी व्यत करण्यात आली. दर्जा शिलाई योग्य नसल्याने कर्मचाऱयांनीही वाटप केलेले गणवेश परत केले हेते.

दरम्यान, जिल्हय़ातील चालक, वाहक, मॅकेनिकल पर्यवेक्षकांपर्यंत जानेवारी 2018 नंतर हे गणवेश अद्याप पोहोचलेच नाहीत, असे सांगण्यात आले. याबाबत विभाग नियंत्रक कार्यालयाशी संपर्क साधला असता चालक, वाहकांचे गणवेश नुकतेच (दोन दिवसांपूर्वी) प्राप्त झाले असल्याचे, मात्र त्यांचे वाटप होण्यास पंधरवडा लागेल असे सांगण्यात आले. तर उर्वरित कर्मचाऱयांचे (मॅकेनिक, पर्यवेक्षक) गणवेश अद्याप आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, वाटप करण्यासाठी प्राप्त झालेले गणवेश संबंधित कर्मचाऱयांच्या मापाचे आहेत का?, त्या गणवेशाच्या दर्जाचे काय? याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱयांच्या मापानुसारच माहिती कळविण्यात आली होती. त्यानुसारच गणवेश प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सदरचे गणवेश प्राप्त होण्याअगोदरच जिल्हय़ातील कर्मचाऱयांच्या गणवेशापोटी सुमारे 60 लाख रुपयांचे बिलही या विभागाला पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे गणवेश योग्य दर्जाचे मापाचे आहेत का, याबाबत खात्री करण्यापूर्वीच या विभागाकडून सुमारे 35 लाखांहून अधिक रकमेचे बिलही अदा करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात गणवेश खराब निघाले किंवा योग्य मापाचे नसल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

एसटी कर्मचारी वेतन करारासाठी गेल्या दोन वर्षांपासून आंदोलने, संप करीत आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दुसरीकडे गणवेश प्राप्त होण्याअगोदरच लाखो रुपये अदा केले जात नसल्याने कर्मचाऱयांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts: