|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुंबई-गोवा महामार्गावर 27 ‘ब्लॅक स्पॉट’

मुंबई-गोवा महामार्गावर 27 ‘ब्लॅक स्पॉट’ 

वारंवार अपघातांची संवेदनशील ठिकाणे निश्चित

वाहतूक पोलीस, बांधकाम विभाग, महामार्ग पोलिसांचे संयुक्त सर्वेक्षण

प्रतिनिधी /रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्ग वारंवार अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असून सातत्याने होणाऱया अपघातांची गंभीर स्थिती लक्षात घेता या महामार्गावरील 27 ठिकाणे धोकादायक निश्चित करण्यात आली आहेत. वाहतूक पोलीस, बांधकाम विभाग आणि महामार्ग पोलिसांनी केलेल्या संयुक्त पाहणीनंतर या ‘ब्लॅक स्पॉट’वर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कोकणात येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग हा महत्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग असून आता या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेगाने प्रारंभ झालेला आहे. पण या महामार्गावर एप्रिल-मे व गणेशोत्सव या काळात मोठय़ा प्रमाणात वाहनांची गर्दी होताना दिसते. अशा या महामार्गावर होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता मार्गावरील अरुंद ठिकाणे, अवघड वळणे, घाटरस्त्यावरून वाहने चालविणे म्हणजे वाहनधारकांना दिव्यच उभे असते. नवखे चालक, वाहनाने गाठलेली टोकाची पातळी, निष्काळजीपणा यामुळे महामार्गावरील अपघातात दिवसेंदिवस भर पडत आहेत.

गेल्या 3 महिन्यात जानेवारी ते मार्च दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर 97 लहान-मोठे अपघात  घडले आहेत. त्यामध्ये 12 अपघात वाहनधारकांचे जीवघेणे ठरले आहेत. या अपघातात 26 जण गतप्राण झाले. 22 अपघातात 27 जण गंभीर जखमी झाले.  तसेच एप्रिल महिन्यात मुंबई-गोवा महामार्गावर 41 अपघात झालेले असून त्यामध्ये 18 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच 19 जण गंभीर व 37 जण किरकोळ जखमी झाले. त्यामुळे या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जरी चौपदरीकरणाचे काम सुरू झालेले असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर हे ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित करण्यात आल्याचे वाहतूक पोलीस विभागामार्फत सांगण्यात आले आहे. त्याठिकाणी खबरदारीच्या उपयोजना आखण्यात आल्या आहेत.

महामार्गावर निश्चित करण्यात आलेली अपघातग्रस्त संवेदनशील ठिकाणेः

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनधारकांच्या निष्काळजीपणामुळे वारंवार अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहेत. त्यामध्ये कशेडी घाट, पर्शुराम घाट, कामथे घाट, आगवे, कापडगाव, निवळी, वेरळ, वाटूळ, आंजणारी, हातखंबा दर्गा, या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

Related posts: