|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यड्रावकर सोशल फौंडेशनच्यावतीने मतीमंद मुलांच्या मातेचा सन्मान

यड्रावकर सोशल फौंडेशनच्यावतीने मतीमंद मुलांच्या मातेचा सन्मान 

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

आई हा शब्द कानावर पडला की मन लगेच हळव होतं. एकेकडे चेहऱयावर हसू फुटतं, तर दुसरीकडे डोळ्यांच्या कडा ओलावतात. जयसिंगपूर येथील तिसऱया गल्लीतील सौ. सुजाता मानाजी पाटील या गृहिणीने दोन मतिमंद मुलांचा सांभाळ करून आयुष्यातील एक चॅलेंज स्विकारले, अशा कर्तृत्व संपन्न मातेचा सन्मान आज मातृत्व दिनाच्यानिमित्ताने राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंडेशनच्यावतीने करण्यात आला.

जयसिंगपुरातील तिसऱया गल्लीतील सौ.सुजाता पाटील या मुळच्या सोनी पाटगाव येथील त्यांचे पती लष्करातून निवृत्त होऊन पुण्याच्या एका खाजगी कंपनीत नोकरीस आहेत. पाटील दाम्पत्यांना अक्षय (वय 21) व अमेय (वय 18) अशी दोन मतिमंद मुले आहेत. ही दोन्ही मुले सौरभ मतिमंद शाळेत शिक्षण घेतलेली आहेत. ही शाळा सद्या बंद असून ती सुरू रहावी, यासाठी प्रयत्न करण्याचे मनोगत अनेकांनी यावेळी व्यक्त केले.

सौ. सुजाता पाटील म्हणाल्या, समाजामध्ये चांगल्या मुलांचा सांभाळ करणे सोपे आहे. मात्र मतिमंद मुलांचा सांभाळ करणे आयुष्यातील एक चॅलेंज आहे. हे चॅलेंज स्विकारून मुलांचे पालनपोषण करीत आहे. आई-वडील आहेत तोपर्यंत अशा मुलांचा सांभाळ होईल, मात्र त्यांच्या पश्चात पालन पोषणासाठी शासनाने पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी करून त्यांनी मतिमंद मुलांना व्यावसायिक शिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले. हे सांगत असताना एक मतिमंद मुलांची आई म्हणून त्यांचे डोळे पाणावले होते आणि त्या अत्यंत भावूक झाल्या होत्या.

मातृत्व दिनाचे औचित्य साधून डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंडेशनच्यावतीने सौ. सुजाता पाटील यांचा सन्मान आदित्य पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते आज करण्यात आला.

याप्रसंगी अजित उपाध्ये, संभाजी मोरे, पप्पू दानोळे, अमर पाटील, अनुप मगदूम, किर्तीकुमार चौगुले, संतोष कोथळे, पराग माणगावे आदी उपस्थित होते.