|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मिऱया, गणपतीपुळे किनाऱयांची ‘केंद्रा’कडून होणार स्वच्छता

मिऱया, गणपतीपुळे किनाऱयांची ‘केंद्रा’कडून होणार स्वच्छता 

प्रत्येकी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांचा घेणार सहभाग

5 जूनपर्यंत पूर्ण होणार उपक्रम

प्रतिनिधी /रत्नागिरी

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील 19 राज्यातील 48 नद्या व समुद्र किनाऱयांची स्वच्छता करण्यात येणार आहे. यात रत्नागिरीतील मिऱया व गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱयांचा समावेश करण्यात आला असून स्वच्छता मोहिमेसाठी प्रत्येकी दहा लाख रुपयोचा निधी देण्यात आला आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने 19 राज्यातील 24 नद्या आणि 24 समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कृष्णा व मुळा-मुठा या नद्या आहेत, तर रत्नागिरी जिह्यातील मिऱया व गणपतीपुळे या समुद्र किनाऱयांचा समावेश आहे.

 या स्वच्छता मोहिमेसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 19 टिम बनवल्या आहेत. यामध्ये केंद्रीय पर्यावरण, वने, हवामान बदल विभागाचे वरीष्ठ अधिकारी, राज्यातील नोडल ऐजन्सी,  राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळे, जिल्हा प्रशासन, समुद्र किनारी असणारे मत्स्य महाविद्यालय तसेच अन्य शैक्षणिक, संशोधन संस्थांचाही यात सामवेश आहे.  या टिम स्थानिक शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, स्थानिक समुहांना सोबत घेऊन स्वच्छता मोहिम राबविणार आहेत. या मोहिमेसाठी पर्यावरण विभागाने इको क्लब शाळेंचा सहभाग घेतला आहे. विभागाच्यावतीने राष्ट्रीय हरीत कॉर्प्स कार्यक्रमातंर्गत या मोहिमेसाठी आर्थिक मदत पुरविली जाणार आहे.

स्वच्छता मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या नद्या, समुद्र किनारे, तलावांना स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रूपये खर्च करण्यात येईल. निवडण्यात आलेल्या स्थळांच्या आसपासच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूही स्वच्छ करण्यात येतील. ही मोहिम 15 मे पासून सुरू करण्यात आली असून ती 5 जूनपर्यंत राबविली जाणार आहे. या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्न मंजुषा, वाद-विवाद स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे.