|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘पूर्व मान्सून’ची जिह्यात धडक!

‘पूर्व मान्सून’ची जिह्यात धडक! 

सोसाटय़ाचा वारा, वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

अनेक ठिकाणी वीज गायब

झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत

आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी जिह्यात गुरूवारी सायंकाळी सोसाटय़ाच्या वारा, वीजांचा कडकडाट पूर्वमान्सूनने जोरदार धडक दिली. अचानक आभाळ भरून येऊन कोसळलेल्या सरींनी साऱयांचीच त्रेधातिरपीट उडाली. अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून देवरूख, चिपळुणसह बहुतांश भागात वीज गायब होती. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून व पडझड होऊन नुकसानीच्या घटना घडल्या. दरम्यान आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले.

मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच रत्नागिरीच्या तापमानात मोठी वाढ झाली. पारा कायमच 34 च्या आसपास राहील्याने जिल्हावासीय उष्णतेने प्रचंड हैराण झाले होते. गुरूवारीही सकाळपासूनच उन्हाचे जोरदार चटके जाणवत असल्याने पावसाचा अंदाज वर्तवला जात होता. सायंकाळी 3 वाजल्यानंतर अचानक आभाळ दाटून आले आणि काही वेळातच जिल्हय़ाच्या विविध भागात मान्सन पूर्व पावसाच्या सरी बरसू लागल्या

हवामान खात्यानेही 17, 18 व 19 रोजी कोकणात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली होती. हे खरे ठरले. रत्नागिरी शहरात गुरूवारी सायंकाळी 5 च्या सुमारास सोसाटय़ाचा वारा व वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. एक जोरदार सर झाल्यातंतर सुमारे तासभर तुरळक सरी कोसळत होत्या. पाऊस थांबल्यानंतरही आभाळ पूर्णतः दाटलेलेच होते. वातावरण इतके ढगाळ होते की समोरचे दिसणेही कठीण झाले. त्यामुळे वाहन चालकांनी  लाईट लावून गाडया चालवाव्या लागत होत्या. वीजांचा लखलखाटही सुरूच होता.

भाटय़ात झाड कोसळले

वाऱयाचा वेगही नेहमीपेक्षा अधिक होता. अचानक आलेल्या पावसाने काही काळापुरते जनजीवन विस्कळीत झाले. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे भाटय़े येथील सुरूबनातील झाड मुख्यरस्त्यावर आडवे कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद झाली होती. स्थानिकांनी हे झाड बाजूला हलवत वाहतूक सुरळीत केली. या मोसमातील पावसाच्या पहिल्याच सरी भिजून अनुभवल्या. उन्हामुळे लाहीलाही होत असल्याने मुलांनी अंगणात नाचून पावसात भिजून यंदाच्या मोसमातील पहिल्या पावसाचा आनंद लुटला.

चौपदरीकरणामुळे महामार्गावर माती येण्याची शक्यता

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने पावसामुळे महामार्गावर चिकण माती येऊन रस्ता धोकादायक होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यावर दरड येण्याची, तसेच काही ठिकाणी रस्ता खचण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महामार्गावर वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवत वाहने खबरदारीने सावकाश चालविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

समुद्रात कमी दाबाचा पट्टा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार गल्फच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील 6 तासांत समुद्रात ताशी 45-55 ते 85 किमी वेगाने वारे वहाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा

पुढील 24 तासांत 65-75  किमी वेगाने वारे वहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तास समुद्र खवळलेला रहाणार आहे. तरी येथील कार्यक्षेत्रातील सर्व मच्छिमार सोसायटय़ांना व मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यातर्फे देण्यात आला आहे.

आंबा बागायदार चिंतेत

 पावसामुळे आंबा बागायतदार मात्र चिंतेत सापडले आहेत. अगोदरच आंबा पिक कमी, त्यात हंगामाचा अखेरचा टप्पा यामुळे बागायतदार चिंतातूर आहे. असाच पाऊस सुरू राहीला तर बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

लांजात गारवा

तालुक्याच्या पुर्व भागात गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास पावसाचे आगमन झाले. गेल्या दोन दिवसांपासूनच असलेल्या ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यामुळे या पावसाने चांगलाच गारवा निर्माण झाला. अचानक जोरदार पावसाचे आगमन झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या आंबा, काजुवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ओणीत गारांचा पाऊस

राजापूरात पुन्हा गुरूवारी सायंकाळी विजांचा कडकडाट व वादळी वाऱयांसह पावसाच्या सरी कोसळल्या तर ओणी परिसरात गारांसह पावसाने हजेरी लावली. शहरात गुरूवारी भरणाऱया आठवडा बाजारात खरेदीसाठी गर्दी झालेली असतानाच पाऊस कोसळल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली.  तालुक्यात चार दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती.

 संगमेश्वरात वादळी पाऊस

संगमेश्वर व देवरूखसह विविध भागातही या पावसाने हजेरी लावली. संगमेश्वर शह  शहर परिसरातील शिवणे, माभळे, ओझरखोलसह अनेक गावांतून वादळी वाऱयासह पावसाळा जोरदार सुरुवात झाल्याने शेतकऱयांची एकच धावपळ उडाली. वांद्री पसिरात अनेक घरांचे पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी पडझड झाली. वाऱयामुळे काही †िठकाणी झाडे पडण्याची घटना घडल्या तर बाजारात आलेल्या ग्राहकांची धावपळ उडाली.

चिपळूणमध्ये नुकसान

वादळी पावसात तालुक्यातील कळंबस्तेत घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. तसेच वृक्ष कोसळल्याने धामणंद मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी वीज गायब होती. बाजारपेठेतील व्यापाऱयांनाही त्रास सहन करावा लागला.

खेडमध्ये धावपळ

  गुरूवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास खेडमध्ये पावसाचा शिडकावा झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे तीनबत्तीनाका येथे विक्रीसाठी बसलेल्या आंबा व सुकी मासळी विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली.

Related posts: