|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धावपळीत ‘माणूसपण हरवत चाललयं’

धावपळीत ‘माणूसपण हरवत चाललयं’ 

विजयकुमार बुरुड/   निपाणी

जुन्या आठवणी आजही अनेकांना ताजे तवाने करतात. सहज गावातून फेरफटका मारला तर जुनी जाणकार व मध्यमवयीन लोक आपली सगळी कामे आटोपून बोलत बसतात. तेव्हा त्यांच्यातील काही महत्त्वाचे बोलने संपले की आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात या चर्चा अधिक होतात. जे लोक ग्रामीण भागातून शहरात वास्तव्यास आहेत. त्यांना मात्र राहून राहून आपल्या लहानपणीच्या गावातील आठवणी येतात. जुनं तेच सोनं, ‘आमच्या सारखं आनदी जगणं आता नाही’, ‘काय ते दिवस होते’, ‘आताच्या धकाधकीच्या जगण्यात माणूसपण हरवत चाललयं’ यासह अनेक वाक्ये मध्येच वापरुन या चर्चेला सुरुवात होते.

पूर्वी शाळांमध्ये सलग बैठक व्यवस्था होती. तर आता बेंच पद्धतीमुळे मुलांमध्ये अंतर ठेवले जात आहे. सुसूत्रतेच्या नावाखाली मुलांमधील संवाद कमी होत चाललाय. पुढच्या बेंचवर बसणारा हुशार तर मागे बसणारा कमी हुशार अशी स्पर्धाच आहे. आता प्रत्येक घरात एक गाडी हमखास पहायला मिळते. त्यामुळे खास फिरविण्यासाठी ताशी 3 रुपये देऊन भाडय़ाने घेतली जाणारी सायकल आज कुठेतरी पहावयास मिळते. आंब्याच्या झाडाखाली सुरु असेली क्रिकेट मॅच आता मोबाईलवर नाही तर टिव्हीवर बघण्यात आजही पिढी धन्यता मानते. पण गावात एकाने अडगळीत चौकार मारल्यानंतर चेंडू शोधण्यासाठी दोन्ही टिमची मुल जायची ती मजा आज राहिलेली नाही.

शाळा सुरु झाली की वह्या खरेदी करायच्या. त्यावरील पोस्टर पाहून त्याचा विषय ठरविला जात होता. आकर्षक पोस्टरची वही आवडत्या विषयाला तर इतर वह्या इतर विषयांना घातल्या जात होत्या. आजच्या विद्यार्थ्यांकडे वह्याचे प्रमाणच कमी असल्याने आवड निवड राहीली नाही. लहानपणी रात्री धोधो पडणारा पाऊस सकाळी थांबायचा त्यावेळी पावसात आपण भिजू शकलो नाही, याच दुःख व्हायचं. शाळेच्या मधल्या सुट्टीत दफ्तर घेऊन घरी पळून जाण्याची मजाच काही और होती. काही तरी कारण सांगून शाळेला दांडी मारताना होणारा आनंद शब्दात व्यक्त न करण्यासारखा होता.

शाळे, महाविद्यालयाच्या मधल्या सुटीत बेंचवर गाण्याचे संगीत वाजवणारी मंडळी आजच्या संगीतकारापेक्षा चांगली वाटतात. ना सूर ना ताल पण मजा घेत ते वाजवणे आजही कानात घुमते. त्यावेळी सुरांच्या कसोटीवर खरी उतरलेली गाणी ऐकायला नकोशी वाटतात. लहानपणी कलिंगड खाताना त्यातील बिया पोटात जाऊ नये, बी पोटात गेल्यानंतर झाड उगवेत अशी भिती वाटत होती. पण आजची लहानमुल सिगरेट ओढताना पाहिली की का कुणास ठाऊन मन असवस्थ होते. तासंतास मोबाईलच्या जाळय़ात अडकेल्या मुलांना आपल्या परिसराचे ज्ञान नाही. पालकांच्या अपेक्षांचे ओझे वाहून नेणारे ते एक जनावर आपण तयार करत आहोत, हे पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. संस्कार या शब्दाला महत्त्व देण्याची गरज आहे. पण काहीही म्हणा आता माणुसकी शिल्लक राहीली नाही. धावपळीच्या या जगण्यात आता आपल्या बाजुला बसलेल्याकडे बघायला वेळ नाही.

  यात्रा, जत्रांमध्ये मिळणार मिठाई आता कुठेच दिसत नाही. पॅकबंद असणारी मिठाई खाताना त्याच्या रॅपरवरील कॅलरी, सॅकरीन, फॅट याचे विश्लेषण पाहून मन नाराज होते. मामाच्या गावाला गेल्यानंतर मिळणारी मजा आज हजारो किलोमिटरच्या ट्रिपमध्ये नाही. आता जो तो आपल्या व्यापात आहे. त्यामुळे ना मामाचा गाव ना जुन्या मित्रांना भेटणे. जगण्याच्या या शर्यतीत आपण केवळ एक मशिन बनत चाललो आहोत. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य होत नाही. मग दोष वेळेला द्यायचा की जगण्याला? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.