|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » थॉमस चषक स्पर्धेत भारताची सुरुवात पराभवाने

थॉमस चषक स्पर्धेत भारताची सुरुवात पराभवाने 

पुरुषांत नवख्या फ्रान्सकडून 4-1 ने धुव्वा, उबेर चषकातही कॅनडाकडून भारताची 4-1 ने हार

वृत्तसंस्था/ बँकॉक

रविवारपासून सुरु झालेल्या थॉमस व उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाची सुरुवात पराभवाने झाली. पुरुष गटात नवख्या फ्रान्सकडून 4-1 तर महिलांत कॅनडाकडून 4-1 असा भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला. सलामीच्या लढतीत पराभवाचा दणका बसल्याने नॉकआऊटमध्ये पोहोचण्याच्या भारताच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.

पुरुषांच्या थॉमस चषक स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणीतने फ्रान्सच्या ब्राईस लेवरडेजला 21-7, 21-18 असे नमवत विजयी प्रारंभ केला. मात्र, अन्य लढतीत भारतीय खेळाडूंना अपेक्षित खेळ साकारता आला नाही. पुरुष दुहेरीतील दुसऱया सामन्यात अर्जुन-रामचंद्रन जोडीला प्रतिस्पर्धी कारसोडी-ज्युलियो जोडीने 13-21, 16-21 असे पराभूत केले. यानंतर, परतीच्या एकेरी सामन्यात देखील युवा समीर वर्माला लुकास कोरवीने 18-21, 22-20, 18-21 असे नमवत फ्रान्सला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पुरुष दुहेरीच्या सामन्यात अरुण जॉर्ज व संयम शुक्ला जोडीला प्रतिस्पर्धी गिक्वेल-लाबेर जोडीने 10-21, 12-21 असे तर एकेरीच्या लढतीत लक्ष्य सेनला ज्युनियर पोपोवने 20-22, 21-19, 19-21 असे नमवताना फ्रान्सला 4-1 असा दणकेबाज विजय मिळवून दिला. आता, सोमवारी भारताची पुढील लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल.

उबेर चषकातही भारताची निराशा

सायना नेहवालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱया भारतीय संघाला सलामीच्या लढतीत कॅनडाकडून 4-1 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. दिग्गज खेळाडू सायनाला प्रतिस्पर्धी मिशेली लीने संघर्षमय लढतीत 15-21, 21-16, 21-16 असे नमवले. यानंतर, दुसऱया एकेरीच्या लढतीत युवा वैष्णवीला रॅचेल हेंड्रिक्सने 11-21, 13-21 असे नमवत कॅनडाने 2-0 अशी घेतली होती. दुहेरीच्या लढतीत मात्र मेघना-पूर्वशा भारतीय जोडीने प्रतिस्पर्धी मिशेली-जोसेफ जोडीला 21-19, 21-15 असे पराभूत करत आघाडी 2-1 ने कमी केली. मात्र, पुढील एकेरीच्या लढतीत साई प्रियाला ब्रिटनी टेमने 21-11, 21-15 असे तर दुहेरीच्या लढतीत संयोगिता-प्राजक्ता जोडीला रॅचेल-ख्रिस्टिन जोडीने 21-15, 21-16 असे नमवताना कॅनडाला 4-1 असा विजय मिळवून दिला. पुढील लढतीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल.