|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » खून प्रकरणातील बेपत्ता नगरसेवक आरोपीसह तिघांना पकडले

खून प्रकरणातील बेपत्ता नगरसेवक आरोपीसह तिघांना पकडले 

वार्ताहर/ मंगळवेढा

फेसबुकवर कमेंट केल्यावरून सचिन कलुबर्मेचा भरचौकात खून करून जवळपास एक महिनाभर बेपत्ता असलेले आरोपी नगरसेवक पांडुरंग शिवाजी नाईकवाडी (वय 31), प्रशांत सुभाष यादव (वय 26) तसेच पंढरपूर येथील शिवराज बाळासाहेब ननवरे (वय 22) या तिघांना सोलापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना गुजरात येथून पकडण्यात यश आले. दरम्यान, नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांना वाढदिवसाच्या दिवशीच गजाआड होण्याची वेळ आली.

 25 एप्रिल रोजी मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौकातून एका लग्नाची वरात जाताना सायंकाळी भरचौकात सचिन ज्ञानेश्वर कलुबर्मेचा कोयत्याने गळयावर, हातावर वार करून खून केला होता. या घटनेनंतर तीन आरोपींना पकडले तर वरील तिघे बेपत्ता झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेपत्ता आरोपींच्या शोधासाठी पुणे, कर्नाटक येथे सापळा लावला होता. मात्र सातत्याने जागा बदलत असल्यामुळे ते सापडत नव्हते. पोलिस अधिक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस उपनिरीक्षक बाबुराव म्हेत्रे, पोलिस हवालदार गोरखनाथ गांगुर्डे, नारायण गोलेकर, पोकॉ अरूण केंद्रे, सागर शिंदे आदिंनी गुजरात राज्यातील जनोद, ता. वापी जि. बलसाड येथे शनिवारी सापळा लावला असता वरील तिघे अलगद जाळयात आले.

जवळपास महिनाभर पोलिसांना हे नगरसेवक गुंगारा देत होते. आरोपीला अटक करावी यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनापासून पासून पोलिस स्टेशनसमोर मयताच्या कलुबर्मे कुटुंबियांनी तीन दिवस उपोषण केले. पोलिस प्रशासनाने आरोपीला लवकरच अटक करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.

आरोपी न सापडल्यास 21 मे रोजी मंगळवेढा-सोलापूर मार्गावर रास्तारोको करण्याचे लेखी निवेदन उपोषणकर्ते कलुबर्मे कुटुंबिय व राज्य जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी दिले होते. पोलिस प्रशासनास आरोपी पकडण्याची दिलेली मुदत संपत येत असल्याने पोलिस प्रशासन तणावाखाली होते. मात्र शनिवारी गुजरात येथून आरोपींना पकडल्यामुळे पोलिस प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

नगरसेवक राजकीय असल्याने पोलिस पकडण्यात टाळाटाळ करीत असल्याचा कुटुंबियांचा संशय होता. अखेर पोलिस प्रशासनाने मुख्य आरोपी असलेल्या नगरसेवकाला पकडल्यामुळे कलुबर्मे कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तसेच तपासिक अंमलदार प्रभाकर मोरे यांनीही तपास पथके नेमली होती.

दरम्यान यातील आरोपी प्रशांत यादववर अज्ञातस्थळी काही दिवसापूर्वी वाढदिवस साजरा करण्याची वेळ आली होती. तर पांडुरंग नाईकवाडी याचा रविवार 20 रोजी वाढदिवस असून या दिवशी त्याला कारागृहात वाढदिवस साजरा करण्याची वेळ आली आहे.