|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तेजसला ‘थंडा’ प्रतिसाद, तुतारीची उपेक्षाच!

तेजसला ‘थंडा’ प्रतिसाद, तुतारीची उपेक्षाच! 

वर्षपुर्ती विशेष

रत्नागिरी

दिनांक 22 मे 2017…. रत्नागिरी रेल्वेस्थानकावर उत्साहाला उधाण आले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर देशातील सर्वात आधुनिक ‘तेजस एक्स्प्रेस’ तर तर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर जनमागणीतून नामकरण झालेली सावंतवाडी-दादर ‘तुतारी एक्स्प्रेस’ चे आगमन होणार होते. या विषयात रस आणि औत्सुक्य असलेली मंडळी त्यामुळे माध्यम प्रतिनिधींना भरभरून मुलाखती देत होती. पण आज बरोबर 1 वर्षानंतर जर दोन्ही गाडय़ांचे अवलोकन केले तर संपुर्ण वातानुकलीत कूल ‘तेजस एक्स्प्रेस’ला मिळालेला प्रतिसाद थंडा आहे आणि सिंधुवासियांच्या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्याने ‘तुतारी एक्स्प्रेस’ची उपेक्षाच झाल्याचे म्हणावे लागेल.

तेजस सुपरफ्लॉप

कोकणचे सुपुत्र आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंमुळे ‘तेजस एक्स्प्रेस’ कोकण रेल्वेवर आली. खरतर ही गाडी उत्तर रेल्वेकडे जायची होती पण प्रभुंमुळे ती मध्यरेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर धावली. उद्घाटनावेळी प्रचंड गाजावाजा, रुळावरील विमान, आधुनिक आणि स्वयंचलित सुविधा, 130 किमीचा वेग अशी अनेक वैशिष्टय़े असलेली ही गाडी प्रवाशाला आकर्षित करेल असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात घडले आहे ते उलटच! प्रवाशांनी इतर वेळी या गाडीकडे पाठ फिरवली आहे. 2 दिवसाच्या सुटय़ा जोडून आलेला विकेंड असला की शुक्रवार (डाऊन) रविवार (अप), गणपती आगमन आणि गणपती विसर्जन, दिवाळी, होळी आणि स्पेशल जत्रा याच काळात काय ती ‘तेजस’ फुल असते. आज वर्षपूर्तीदिनी ‘तेजस’मध्ये रत्नागिरी-करमाळी मार्गावर 73 सिट्स उपलब्ध होत्या.

‘तेजस’ सुटते पहाटे 5 वाजता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहिली लोकल पोहचते पावणे पाच वाजता. म्हणजे उपनगरातील लोकांना या गाडीसाठी पोहचणे कठीणच. त्या मानाने ठाणे-पनवेल येथील वेळा तुलनात्मक सोईच्या पडतात. पण गाडीत सामान ठेवायला जागा अपुरी पडते. इतर डबे रिकामे असले तरी तिकिट परीक्षक आणि रेल्वे स्टाफ ते बंद करुन ठेवतात. काही वेळा चक्क एसी बंद केले जातात म्हणून मोकळी जागा असूनही आहे त्याच डब्यात जरा अवघडलेल्या स्थितीत यावे लागते.

तेजसच्या एलसीडी टीव्ही सुविधेत पहिले 3 महिने कोणताच बदल झाला नव्हता. नियमित प्रवास करणारे तेच ते सिनेमा, तिच ती गाणी आणि तेच ते गेम्स यांना कंटाळले. सुरुवातीला चांगले इअरफोन मिळत पुढे 20 रुपयांत चायना मेड मिळायला लागले. भरमसाट पैसे तिकाटासाठी मोजणाऱया कोकणी माणसाला हे स्विकारार्ह नाही.

प्रवाशांचा ‘नो फूड’चा पर्याय

तेजसचे अंतिम स्थानक करमाळी आहे, मडगाव नाही. हे स्थानक तसे गैरसोईचे पडते. शिवाय तेजस दुपारी 1.30 वा. पोहचते. ही जेवणाची वेळ असल्याने गोव्यात उतरुन खाणे-पिणे करु इच्छीणारे नो फूड हा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे पॅटरिंग सर्व्हिस देणारे अडचणीत येतात. गोव्याकडे जाताना जेवण साधारणतः कुडाळ स्थानकाचे (344 किमी) आसपास मिळते. नंतर करमाळी (413 किमी) येथे जायला उरतात 69 किमी. जेवण संपेपर्यंत उतरायचे त्यापेक्षा उतरुन जेवलेले बरे असे म्हणणारे आहेत. सुरुवातीला 3 महिन्यात तेजसमधील नाश्ता विमानासारखा ब्रेड-कटलेट, बटर-जॅम-सॉस, केक, कोल्ड्रींक असा होता. आता पोहे, इडली, डोसा मिळतो. हे खाणे जनशताब्दीमध्येपण कमी पैशात मिळते.

अनेकदा उशीराच

तेजसची वेळा पाळण्याची सध्याची स्थिती चांगली नाही. दिवसातून आणि मालगाडय़ा, रो-रो सेवा, स्पेशल गाडय़ा या नुसार तेजस 15 ते 30 मिनिटे उशिरा धावते. एकदातर 1 तास 23 मिनिटे उशीरा होती. याला फ्लॉप नाही तर काय म्हणायचे?

तुतारीबाबत अपेक्षाभंगच

दादर-सावंतवाडी-दादर या राज्यराणी एक्स्प्रेसचे नामकरण ‘तुतारी एक्स्प्रेस’ करण्यात आले. नाव बदलल्याने कार्य बदलत नाही, हे आज एका वर्षानंतर सिध्द झाले आहे. या गाडीत सोईपेक्षा गैरसोयीच जास्त आहेत आणि नाईलाज म्हणून सिंधुदुर्गवासियांनी ती गाडी स्वीकारली आहे. मुळात ही गाडी दादर स्थानकातून मध्यरात्री 00.05 वाजता सुटते. म्हणजे रेल्वेचा दिवस बदलतो. 22 मे रोजी प्रवास करायचा असला तर 21 मे रोजी रात्रीचे जेवण झाले की स्थानक गाठायला हवे. या घोळामुळे दररोज किमान 2 जण तिकिटे चुकीचे घेउढन येतात आणि मग त्याच डब्यात तसेच झोपतात. ही रोजची रडकथा आहे.

तुतारीला डबे 15 आणि पॅण्ट्री सेवा नाही. त्यामुळे गाडीत 2 प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रेते असतात. वेगवेगळ्या स्थानकांवर येणारे ‘लोकल’ने 2-3 स्थानके झाली की गायब होतात आणि रेल्वेचे केटरींग सर्व्हिसवाले यांच्याकडे मोजका स्टॉक असतो आणि तो संपला की ते पण फिरकत नाहीत. कोकणकन्या या ‘फुडकिंग’ गाडीच्या मानाने तुतारीत दुष्काळ असतो. तुतारीमध्ये टॉयलेटमध्ये पाण्याची बोंबाबोंब कायमची आहे. पाणी भरण्याची सोय फारच मोजकी असल्याने ज्या टॉयलेटला पाणी ते आपले असे म्हणावे लागेल. वेळा पाळण्याच्या बाबतीत ही गाडी म्हणजे आनंदी आनंद आहेगाडीचे 15 डबे वाढवून ते कायमस्वरुपी 18 करण्याची योजना आहे असे गेले वर्षभर फक्त ऐकत आलो आहे.

एक्स्प्रेस नव्हे फास्ट पॅसेंजर

. कधी सायडिंगला टाकतील आणि किती वेळ थांबेल याचे गणित नाही. 30 मिनिटे उशीर हा सामान्य उशीर आहे. डाऊन मार्गावर फक्त 1 गाडी तुतारीला ओव्हरटेक करते पण अप मार्गावर 3 गाडय़ा तुतारीला ओव्हरटेक करतात. त्यामुळे तुतारी ही फास्ट पॅसेंजर असून एक्स्प्रेस नावाने चालवतात. कोकण रेल्वेच्या ठोकूर-कारवार या 252 किमी अंतरात कर्नाटकची यशवंतपुरा कारवार राज्यराणी फक्त 10 स्टॉप घेते. तर रोहा सावंतवाडी या 364 किमी अंतरात दादर-सावंतवाडी तुतारी राज्यराणी 17 स्टॉप घेते. म्हणजे तुतारी एक प्रकारची पॅसेंजरच आहे.

नाव तुतारी, आवाज पिपाणी

तुतारी एक्स्प्रेसमध्ये तिकिट निरीक्षक भेटले म्हणजे भाग्याचा दिवस मानायला लागतो. परिणामी स्लिपरच्या डब्यात पॅसेज, दरवाजा येथे अनारिक्षीत तिकीटधारक झोपणे नित्याचे झाले आहे. सावंतवाडी आणि दादर येथे गाडीचा प्रवास संपला की परतीचा प्रवास सुरु व्हायला भरपूर वेळ असल्याने गाडी वेळेवर जात नाही. सुरक्षा नाही, वाढीव सुविधा नाहीत म्हणून नाव जरी तुतारी तरी आवाज पिपाणीचा अशी या गाडीची दशा आहे.

Related posts: