|Monday, June 17, 2019
You are here: Home » क्रिडा » आयपीएल फायनलसाठी आज चेन्नई-हैदराबाद झुंजणार

आयपीएल फायनलसाठी आज चेन्नई-हैदराबाद झुंजणार 

वानखेडेवरील पहिली क्वॉलिफायर लढत : धोनी व विल्यम्सनच्या धुरंधरात संघर्ष रंगण्याची चिन्हे

वृत्तसंस्था / मुंबई

टेबलटॉपर्स सनरायजर्स हैदराबाद व दुसऱया स्थानावरील चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात आज फायनलमध्ये सर्वप्रथम पोहोचण्यासाठी पहिली क्वॉलिफायर स्पर्धा रंगणार असून साधारणपणे मागील दीड महिन्यांपासून सुरु असलेली आयपीएल स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाची भिस्त रैना, जडेजा, वॅटसन, रायुडू तर केन विल्यम्सनच्या हैदराबादची मदार धवन, मनीष पांडे, रशीद खान, शकीब हसन यांच्यावर प्रामुख्याने असेल. नव्या बदलानुसार, आजची क्वॉलिफायर लढत रात्री 8 ऐवजी सायंकाळी 7 पासून खेळवली जाणार आहे.

आज पहिल्या क्वॉलिफायरमध्ये जिंकणारा संघ या स्पर्धेच्या थेट अंतिम सामन्यात पोहोचेल तर पराभूत संघाला दुसऱया क्वॉलिफायरमध्ये आणखी एक संधी लाभणार आहे. याशिवाय, होणाऱया एलिमिनेटर लढतीत मात्र दुसरी संधी नसेल. तेथे जिंकणारा संघ आजच्या लढतीतील पराभूत संघाशी अंतिम फेरीतील दुसऱया स्थानासाठी झुंजेल.

यंदा, या स्पर्धेच्या साखळी फेरीत या दोन्ही संघांनी प्रत्येकी 18 गुण संपादन केले तर सरासरी धावगतीच्या निकषावर तेथे हैदराबाद अव्वल ठरले. या हंगामात प्रथमच साखळी फेरीतील अगदी शेवटच्या दिवसापर्यंत प्ले-ऑफमधील शेवटचे दोन संघ निश्चित झाले नव्हते, ते ठळक वैशिष्टय़ ठरले. दोन्ही संघांची ताकद पाहता, चेन्नई सुपरकिंग्सचे पारडे थोडेफार जड भासते. मात्र, सनरायजर्स हैदराबादचा संघ कोणत्याही क्षणी मुसंडी मारुन वर येण्यात माहीर असल्याने ही लढत विशेष चुरशीची होईल, अशी अपेक्षा आहे.

सनरायजर्स मुसंडी मारणार का?

शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्ले-ऑफ महत्त्वाकांक्षेला मुरड घातली. सनरायजर्सने दि. 10 मे रोजीच या स्पर्धेतील प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. पण, शेवटचे सलग 3 सामने गमावल्याने ते बहरात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. योगायोगाने चेन्नई सुपरकिंग्सनेच सनरायजर्सची सलग 6 विजयांची मालिका खंडित केली होती.

सनरायजर्सचा संघ कर्णधार केन विल्यम्सनवरच बऱयाच अंशी अवलंबून आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता विल्यम्सन बहरात आहे व त्याने प्रत्येक सामन्यामागे 60 च्या सरासरीने 661 धावांची आतषबाजी केली असली तरी याशिवाय, अन्य सहकाऱयांत त्याला केवळ शिखर धवनचीच थोडीफार साथ लाभली आहे. धवनने या हंगामात आतापर्यंत 437 धावांचे योगदान दिले आहे. चेन्नईला तोडीस तोड लढत द्यायची असेल तर सनरायजर्ससाठी मध्यफळीतील मनीष पांडेसारख्या फलंदाजांनी अधिक सरस प्रदर्शन साकारणे महत्त्वाचे ठरणार आहे. गोलंदाजीत त्यांची भिस्त भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल व संदीप शर्मासह विदेशी फिरकीपटू रशीद खान व शकीब हसन यांच्यावर असेल.

रायुडूचा फॉर्म महत्त्वपूर्ण

रायुडूसारख्या प्रतिस्पर्धी फलंदाजांचा वेळीच बीमोड करायचा असेल तर हैदराबादच्या या गोलंदाजांना आणखी प्रभावी रणनीती अंमलात आणावी लागेल, हे देखील स्पष्ट आहे. दोन्ही संघ यापूर्वी पहिल्या टप्प्यात आमनेसामने भिडले, त्यावेळी रायुडूनेच 79 धावांची धमाकेदार खेळी साकारली होती.

चेन्नईतर्फे रायुडूने सर्वाधिक 586 धावांची आतषबाजी केली असून शेन वॅटसनने 13 सामन्यात 438 धावांचे योगदान दिले आहे. महेंद्रसिंग धोनीसह रैना देखील उत्तम फटकेबाजी करु शकतो, ही चेन्नईची जमेची बाजू ठरु शकते. रैनाने यापूर्वी, किंग्स इलेव्हनविरुद्ध मागील लढतीत नाबाद 61 धावांची खेळी साकारली होती. दक्षिण आफ्रिकन गोलंदाज लुंगी एन्गिडीचा 10 धावात 4 बळींचा पराक्रमही तिथे लक्षवेधी ठरला होता. शार्दुल ठाकुर, दीपक चहर व डेव्हॉन ब्रेव्हो यांच्यावर मध्यमगती तर हरभजन सिंग व रवींद्र जडेजा यांच्यावर फिरकी गोलंदाजीची भिस्त असणार आहे. या पहिल्या क्वॉलिफायरपूर्वी, दुपारी 2 वाजता रंगणारी महिलांची प्रदर्शनीय लढतही लक्षवेधी ठरेल, असे संकेत आहेत.

संभाव्य संघ

चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ डय़ू प्लेसिस, हरभजन सिंग, डेव्हॉन बेव्हो, शेन वॅटसन, अम्बाती रायुडू, दीपक चहर, केएम असिफ, कनिश सेठ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शोरे, मुरली विजय, सॅम बिलिंग्ज, मार्क वूड, क्षितिज शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिश्नोई, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकुर, एन. जगदीशन, डेव्हिड विली.

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, दीपक हुडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसूफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बसिल थम्पी, टी. नटराजन, सचिन बेबी, बिपूल शर्मा, मेहदी हसन, तन्मय अगरवाल, ऍलेक्स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशीद खान, शकीब-उल-हसन, मोहम्मद नबी, ख्रिस जॉर्डन.

सामन्याची वेळ : सायं. 7 पासून.

क्वॉलिफायरपूर्वी रंगणार महिलांची प्रदर्शनीय टी-20

चेन्नई सुपरकिंग्स व सनरायजर्स हैदराबाद हे संघ पहिल्या क्वॉलिफायरमध्ये लढण्यापूर्वी, दुपारी दोन वाजता वानखेडे स्टेडियमवरच ट्रेलब्लेझर्स व सुपरनोव्हाज या संघात महिलांची प्रदर्शनीय टी-20 स्पर्धा रंगणार आहे. ट्रेलब्लेझर्सचे नेतृत्व स्मृती मानधनाकडे तर सुपरनोव्हाज संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे आहे. या दोन्ही संघात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंडच्या 10 राष्ट्रीय महिला खेळाडूंचा सहभाग असणार आहे. न्यूझीलंडची सुझी बेट्स, ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसा हिली, बेथ मूनी, एलिसी पेरी, मेगन स्कट व इंग्लंडची डॅनिएल वॅट यांचा यात प्राधान्याने समावेश आहे.

आयपीएलच्या व्यासपीठावर अशी प्रदर्शनीय लढत आयोजित केल्याबद्दल स्मृती मानधनाने बीसीसीआयचे आभार मानले असून दोन्ही संघ विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील, असे नमूद केले आहे. ‘भारतीय भूमीत विदेशी खेळाडूंसह एखादा सामना होण्याची ही पहिलीच वेळ असून भविष्यात महिलांची आयपीएल स्पर्धा भरवली गेली तर त्यासाठी 4 ते 5 संघ सहजपणे होऊ शकतील’, असा आशावाद तिने यावेळी व्यक्त केला.

हरमनप्रीत कौरने देखील या प्रदर्शनीय लढतीत आपला संघ महत्त्वाकांक्षी योगदान देईल, अशी ग्वाही दिली. महिलांच्या आयपीएलसाठी 4 संघ होऊ शकतात का, या प्रश्नावर तिने होकारार्थी उत्तर दिले. सध्या भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱया 20 महिला खेळाडू आहेत. अ श्रेणीत ही संख्या 30 ते 35 पर्यंत पोहोचते. यात विदेशी खेळाडूही सहभागी होत असतील तर किमान 4 संघ सहज होऊ शकतात, असे हरमनप्रीत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली.

प्रदर्शनीय लढतीसाठी संघ

आयपीएल ट्रेलब्लेझर्स : स्मृती मानधना (कर्णधार), अलिसा हिली (यष्टीरक्षक), सुझी बेट्स, दीप्ती शर्मा, बेथ मुनी, जेमिमाह रॉड्रिग्यूज, डॅनिएले हॅझेल, शिखा पांडे, लिया तहूहू, झुलन गोस्वामी, एकता बिश्त, पूनम यादव, दयालन हेमलता.

आयपीएल सुपरनोव्हाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), डॅनिएले वॅट, मिताली राज, मेग लॅनिंग, सोफी डिव्हाईन, एलिसी पेरी, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूजा वस्त्रकार, मेगन स्कट, राजेश्वरी गायकवाड, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टीरक्षक).

सामन्याची वेळ : दुपारी 2 पासून.