|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » फोटो स्टुडिओतील चोऱयांचे धागेदोरे हाती!

फोटो स्टुडिओतील चोऱयांचे धागेदोरे हाती! 

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची माहिती

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात गेल्या पंधरा दिवसांत फोटो स्टुडिओंना लक्ष्य करून चोरटय़ाकडून किमती कॅमेऱयांवर डल्ला मारला जात आहे. या चोरटय़ांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत तपास सुरू असून तपासात धागेदोरे हाती लागले आहेत. त्यामुळे लवकरच चोरटय़ांना गजाआड करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी मंगळवारी दिली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत जिल्हय़ाच्या सर्व प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

मालवण शहरातील फोटो स्टुडिओ फोडून दोन लाखाचा किमती कॅमेरा चोरटय़ानी लंपास केला. त्या नंतर बांदा आणि कुडाळ शहरातील फोटो स्टुडिओ फोडून किमती कॅमेऱयांवर डल्ला मारण्यात आला. त्यामुळे फोटो स्टुडिओ चालक भयभीत झाले आहेत. चोरीचे सत्र लागोपाठ सुरुच असून पोलिसांना या चोरीचा छडा लावता आलेला नाही. याबाबत पोलीस अधीक्षक दीक्षीत गेडाम यांच्याशी संपर्क साधला असता या चोऱयांचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत सुरू करण्यात आला आहे. फोटो स्टुडिओमध्ये जाऊन चोरटय़ांचे ठसे घेण्यात आले आहेत. तसेच चोरीतील काही धागेदोरेही मिळू लागले आहेत. त्यामुळे लवकरच या चोरांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत, असे ते म्हणाले.

शहराच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु त्यांची देखभाल होत नसल्याने बहुतेक ठिकाणी ते बंदच आहेत. आता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत जिल्हय़ाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. जिल्हय़ात अवैध दारू व्यवसाय करणाऱयांवर कारवाई सुरू असून पुनःपुन्हा अवैध दारुविक्री व्यवसाय करणाऱयांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून पावसाळय़ात वाहन चालकांना प्रवास करणे धोक्याचे ठरू शकते. त्यासाठी पोलीस यंत्रणाही दक्ष असून जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी कंत्राटदार यांची बैठक घेऊन सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Related posts: