|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘रिफायनरी’च्या पाण्यासाठी आणखी 15 गावांचा बळी?

‘रिफायनरी’च्या पाण्यासाठी आणखी 15 गावांचा बळी? 

विजयदुर्ग खाडीवर बांधणार धरण

प्रिंदावणवासीयांनी हाणून पाडला सर्व्हेचा प्रयत्नत

प्रकल्प विरोधी समितीचा तीव्र विरोध

प्रतिनिधी /राजापूर

नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी लागणाऱया पाण्यासाठी विजयदुर्ग खाडीवर तारळ-मणचे येथून खारेपाटणपर्यंत भलेमोठे धरण उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी अगोदरच 17 गावांतील जनतेवर टांगती तलवार असतानाच आता या धरणामुळे आणखी 15 सधन गावांचा बळी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रिफायनरी विरोधी समितीचे पदाधिकाऱयांनी केला आहे. रिफायनरी बरोबरच धरण बांधण्याचा डावही मोडीत काढण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात जगातील सर्वात मोठा असा ग्रीन रिफायनरी प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाला मोठय़ा प्रमाणात विरोध होत असताना शासन मात्र हा प्रकल्प होण्यासाठी आग्रही आहे. या प्रकल्पामुळे प्रकल्प बाधित राजापूर तालुक्यातील 15 व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील गिर्ये व रामेश्वर अशा एकूण 17 गावातील जनतेवर टांगती तलवार उभी राहीलेली आहे. प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाकडे दुर्लक्ष करत रिफायनरी प्रकल्पासाठी लागणाऱया पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विजयदुर्ग खाडीवर धरण बांधण्याचा प्रयत्न शासन पातळीवर सुरू झाला आहे. या धरणासाठी 15 सधन गावांचा बळी देण्यात येणार आहे. विजयदुर्ग खाडीवर तारळ मणचे येथून खारेपाटण पर्यंत भलेमोठे धरण बांधून नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी लागणाऱया पाण्याची सोय करण्यात येणार आहे.

या धरणासाठी काही दिवसांपूर्वी आठ नऊ जणांची एक टीम पाहणी करण्यासाठी प्रिंदावनसह काही गावांमध्ये आली होती. प्रिंदावणमधील ग्रामस्थांनी या टीमला चांगलेच धारेवर धरले. विविध प्रश्नांची सरबत्ती यांच्यावर करण्यात आली. अखेर या परिसरात धरण बांधायचे असून त्याचा सर्व्हे करण्यासाठी आलो असल्याची माहिती या टिमच्या वतीने देण्यात आली. मात्र आम्हाला धरणाची आवश्यकता नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी त्यांना तेथून पिटाळून लावले.

त्यानंतर या टिमने दुसऱया गावात जावून सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रिंदावण गावातील ग्रामस्थांनी अन्य गावातील ग्रामस्थांना याबाबत सावध केल्याने त्यांना सर्व्हे करता आला नाही. सदर धरणासाठी तारळ, उपळे, प्रिंदावन, बांदिवडे, वाल्ये, शेजवली, गुंजवणे, खारेपाटण, वायंगणी, कोर्ले, धालवली, पाटगाव, पोंभुर्ले, मालपे व मणचे या 15 गावांतील खाडी किनारीच्या हजारो एकर बारमाही शेतजमीनीचे भूसंपादन केले जाणार आहे. तसेच शेकडो घरांचे स्थलांतर केले जाणार आहे. मात्र विजयदुर्ग खाडीवर धरण बांधण्याचा शासनाचा डाव लक्षात आल्याने रिफायनरीमुळे त्रस्त झालेली जनता अधिकच त्रस्त झाली आहे.

समिती करणार जनजागृती

जगातील सर्वात मोठय़ा रिफायनरी प्रकल्पासाठी 17 गावांसोबत अजून 15 गावे भरडली जाणार आहेत. त्यामुळे जनप्रक्षोभ आणखीनच भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान महाकाय विनाशकारी रिफायनरी प्रकल्पासह त्यावर आधारित इतर प्रकल्पांच्या परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी रिफायनरी विरोधी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते 27 मे रोजी खारेपाटण ते तारळ, तर 28 मे रोजी मणचे ते खारेपाटण येथील गावागावात जाणार आहेत. रिफायनरी प्रकल्पाबरोबरच धरण बांधण्याचा शासनाचा डाव मोडीत काढण्यासाठी रिफायनरी प्रकल्प विरोधी समिती सज्ज झाली आहे.