|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » सनसनाटी विजयासह चेन्नई सुपरकिंग्स अंतिम फेरीत!

सनसनाटी विजयासह चेन्नई सुपरकिंग्स अंतिम फेरीत! 

सनरायजर्स हैदराबादचा संघर्ष शेवटच्या षटकात निष्फळ, डय़ू प्लेसिस व शार्दुल ठरले चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार

वृत्तसंस्था/ मुंबई

डय़ू प्लेसिस (42 चेंडूत नाबाद 67) व शार्दुल ठाकुर (5 चेंडूत नाबाद 15) यांनी नवव्या गडय़ासाठी 8 चेंडूत 27 धावांची आतषबाजी केल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या पहिल्या क्वॉलिफायर लढतीत चेन्नई सुपरकिंग्सने सनरायजर्स हैदराबादला केवळ 2 गडी राखून नमवत आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. प्रथम फलंदाजीला पाचारण केल्या गेलेल्या हैदराबादला निर्धारित 20 षटकात 7 बाद 139 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागल्यानंतर चेन्नईचीही चांगलीच घसरगुंडी उडाली होती. पण, अंतिमतः अखेरच्या 7 चेंडूत त्यांनी तुफानी फटकेबाजी करत विजय अक्षरशः हैदराबादच्या जबडय़ातून खेचून आणला.

शेवटच्या 3 षटकात 43 धावांची गरज असताना चेन्नईचे शेवटचे तीनच फलंदाज बाकी होते. पण, दहाव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या शार्दुल ठाकुरने 5 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावांची आतषबाजी केली. सलामीला येऊन शेवटपर्यंत यशस्वी झुंज देणाऱया डय़ू प्लेसिसनेच तडाखेबंद षटकार फटकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.

प्रारंभी, विजयासाठी 140 धावांच्या तुलनेने माफक भासणाऱया आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला अक्षरशः नाकीनऊ आले होते. या हंगामात महागडय़ा ठरत आलेल्या भुवनेश्वरने पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर शेन वॅटसनला यष्टीरक्षक गोस्वामीकरवी झेलबाद केले तर मध्यमगती गोलंदाज सिद्धार्थ कौलने चौथ्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर रैना व रायुडू यांना बाद करत एकच खळबळ उडवून दिली. यापैकी, रैना फ्लिक करण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला तर हंगामात सर्वोत्तम बहरात असलेल्या रायुडूला कौलचा डिपर चेंडू किंचीतही कळाला नाही. चेंडू उशिराने स्विंग झाल्यानंतर थेट यष्टीवर आदळला आणि यानंतर हैदराबादच्या चाहत्यांमध्ये उत्साहाला एकच उधाण आले.

बिनीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर अनुभवी कॅप्टनकूल धोनीवर सर्व जबाबदारी होती. प्रारंभी त्याने एकेरी-दुहेरी धावांवर भर देत धावफलक हलता ठेवलाही होता. पण, रशीद खानच्या एका गुगलीने धोनीचा त्रिफळा उडवला आणि एकच खळबळ उडाली. 11 व्या षटकात ब्रेव्हो तर 13 व्या षटकात रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर चेन्नईच्या अडचणीत आणखी भर पडली.

चेन्नईचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना धावगती देखील आवाक्याबाहेर जात होती. त्याचा हैदराबादने चांगला लाभ घेतला. कर्णधार केन विल्यम्सनने गोलंदाजीत केलेले बदल देखील त्यांच्या पथ्यावरच पडले. डय़ू प्लेसिसने एकाकी किल्ला लढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, हरभजन 18 व्या षटकात धावचीत झाल्याने त्यांना आणखी धक्का बसला. या सामन्यातील शेवटच्या टप्प्यात मात्र जणू सारे चित्रच बदलून गेले.

संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 7 बाद 139 : ब्रेथवेट नाबा 43 (29 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), विल्यम्सन 24 (15 चेंडूत 4 चौकार), युसूफ पठाण 24 (29 चेंडूत 3 चौकार), गोस्वामी 12 (9 चेंडूत 2 चौकार), शकीब हसन 12 (10 चेंडूत 2 चौकार), पांडे 8, भुवनेश्वर 7, एन्गिडी 1-20, चहर 1-31, ब्रॅव्हो 2-25, ठाकुर 1-50, जडेजा 1-13), चेन्नई सुपरकिंग्स : 19.1 षटकात 8/140 (फॅफ डय़ू प्लेसिस 42 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 67, शार्दुल ठाकुर 5 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 15, रैना 13 चेंडूत 4 चौकारांसह 22. अवांतर 5. संदीप शर्मा व सिद्धार्थ कौल प्रत्येकी 2 बळी).

18 षटकात कमावले आणि शेवटच्या 7 चेंडूत गमावले!

वास्तविक, सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्सच्या डावाला सातत्याने खिंडार पाडत त्यांना तब्बल 18 षटके दडपणाखाली ठेवण्यात कमालीचे यश प्राप्त केले होते. 18 षटकाअखेर 8 बाद 117 अशी घसरगुंडी उडाली असताना त्यांना उर्वरित 12 चेंडूत 23 धावांची गरज होती. पण, हुकमी सिद्धार्थ कौलच्या या षटकात शार्दुल ठाकुरने 3 चौकार वसूल केल्यानंतर चेन्नईने एकूण 17 धावा वसूल केल्या आणि विजय अक्षरशः त्यांच्या आवाक्यात आला. शेवटच्या षटकात 6 धावांची गरज असताना डय़ू प्लेसिसने भुवनेश्वरला त्याच्या डोक्यावरुनच थेट षटकारासाठी भिरकावून दिले आणि चेन्नईच्या स्वप्नवत विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. या निकालामुळे पहिल्या 18 षटकात उत्तम वर्चस्व गाजवलेल्या हैदराबादची मात्र चांगलीच निराशा झाली.

तो आला, त्याने पाहिले आणि जिंकले सुद्धा!

चेन्नईचा सलामीवीर डय़ू प्लेसिसचा या विजयात अर्थातच सिंहाचा वाटा राहिला. 42 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांची आतषबाजी करणाऱया या दिग्गज फलंदाजाने सलामीला आल्यानंतर सहकारी फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असतानाही अगदी निर्धाराने किल्ला लढवला आणि अंतिमतः तो जिंकून देखील दिला. त्याने भुवनेश्वरला शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकारासाठी पिटाळून लावत अगदी थाटात विजयश्री खेचून आणली.