|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ऍड. निरंजन डावखरेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

ऍड. निरंजन डावखरेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भाजप प्रवेश

विधापरिष सदस्यत्वाचाही राजीनामा

स्थानिक राजकारणाला कंटाळून निर्णय

प्रतिनिधी /मुंबई, रत्नागिरी

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. निरंजन डावखरे यांनी बुधवारी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही बुधवारी राजीनामा दिला. गुरूवारी सकाळ 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याचवेळी विधानपरिषदेसाठी डावखरे यांच्या उमेदवारीची भाजपकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसघांत महिनाभरात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून आपण वडिलांच्या माध्यमातून पक्षाची जडणघडण पाहिली होती. त्यामुळे पक्ष सोडताना दुःख होत असल्याचे डावखरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे त्यांनी आमदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पाठविला.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात 2012 मध्ये ऍड. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीकडून बाजी मारली होती. त्यानंतर त्यांनी सहा वर्षांच्या काळात शिक्षक, पदवीधर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच कोकणातील विविध प्रश्न विधान परिषदेत मांडले होते. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये ऍड. डावखरे यांनी कामकाजावर ठसा उमटविला होता. त्यांच्या आमदारकीची मुदत संपत आली असून पुढील महिन्यातच नव्या टर्मसाठी निवडणूक होत आहे. त्याआधीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात माझ्या वडिलांचा सहभाग होता. पक्षाची जडणघडण मी जवळून पाहिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस ही मला कुटुंबाप्रमाणे होती. त्यामुळे पक्ष सोडताना मला दुःख होत आहे, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पातळीवरील एका गटाकडून सातत्याने डावखरे कुटुंबाविरोधात कारवाया सुरू होत्या. या गटाने 2016 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आपले वडील दिवंगत वसंत डावखरे यांच्याविरोधात कारवाया केल्या होत्या. याबाबत पक्ष़श्रेष्ठींकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे डावखरे यांनी सांगितले.

ठाणे जिल्हय़ातील राष्ट्रवादीच्या सध्याच्या नेतृत्वाकडून आपल्याला सातत्याने डावलण्यात येत होते. शिवाय पक्षाच्या संघटनात्मक कामातूनही बाजूला सारण्यात आले होते. अखेर स्थानिक राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसबाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे आमदार ऍड. निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले. यापुढील वाटचाल आपण लवकरच जाहीर करू, असेही आमदार डावखरे यांनी नमूद केले.

अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात

डावखरे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीवर नाराज होते. भाजपशी त्यांची जवळीकही वाढली होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही डावखरेंच्या संपर्कात होते. विधानपरिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणे ओळखून डावखरे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी सकाळी 11 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे भाजपने अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

राजकीय समीकरणे ओळखूनच निर्णय

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पदवीधर मतदार मतदान करतील. सध्याची राजकीय स्थिती पाहता राष्ट्रवादीकडून पुन्हा विजयी होणे आव्हानात्मक होते. कारण आमदार प्रशांत ठाकुर, मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आदी नेत्यांच्या मदतीशिवाय विजय सोपा नसल्याचे ओळखूनच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय निरंजन डावखरे यांनी घेतल्याची चर्चा आहे.

डावखरेंची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

दरम्यान, निरंजन यांचा आमदारकीचा राजीनामा मंजूर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. निरंजन डावखरे यांना पक्षाने आमदारकीच नाही तर त्यांच्यावर विश्वास टाकून विद्यार्थी आणि युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. पक्षाने अनेकदा संधी देऊनही केवळ संधीसाधूपणामुळे त्यांनी दुसऱया पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.