|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रोहिंग्या दहशतवाद्यांनी केले हिंदूंचे शिरकाण

रोहिंग्या दहशतवाद्यांनी केले हिंदूंचे शिरकाण 

ऍम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालात नमूद : महिला, मुलांसमवेत 99 हिंदूंची झाली हत्या

वृत्तसंस्था/  यंगून

म्यानमारमध्ये रोहिंग्या दहशतवाद्यांनी मागील वर्षी 99 हिंदूंचे शिरकाण केले होते. मृतांमध्ये अनेक महिला आणि मुलांचा देखील समावेश असल्याचा खुलासा ऍम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालाच्या माध्यमातून बुधवारी झाला. दहशतवाद्यांच्या तावडीतून बचावलेल्या एका व्यक्तीने 25-26 ऑगस्ट रोजी रोहिंग्या दहशतवाद्यांनी रखाइन प्रांतात हिंदूंच्या दोन गावांवर हल्ला चढविल्याची माहिती दिली. या अहवालावर म्यानमार सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही.

2017 मध्ये अराकन रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी (एआरएसए) या दहशतवादी संघटनेने मानवाधिकारांचे उल्लंघन केले. बेकायदेशीर मार्गाने लोकांना ओलीस ठेवून त्यांची हत्या करण्याचे कृत्य या दहशतवाद्यांनी केले. नरसंहार घडवून आणण्यासाठी रोहिंग्या आर्मीने स्थानिक गावकऱयांची भरती केली, याच कालावधीत सुरक्षा दलांसोबत त्यांचा संघर्ष देखील सुरू होता, अशी माहिती ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने दिली.

ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचा हा अहवाल रोहिंग्या दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या काही छायाचित्रांचे विश्लेषण आणि त्याने कथन केलेल्या भयावह स्थितीच्या आधारावर तयार करण्यात आला आहे.

क्रौर्याचा नंगानाच

25 ऑगस्ट रोजी रोहिंग्या दहशतवाद्यांनी हिंदूंचे गाव मौन्गदाववर हल्ला चढविला. दहशतवाद्यांनी तेथून 69 लोकांना ताब्यात घेतले, यात पुरुष, महिला अणि त्यांच्या मुलांचा समावेश होता. यातील अनेकांची निर्दयपणे हत्या करण्यात आली, दुसऱयाच दिवशी नजीकच्या एका गावातून 46 जण गूढरित्या बेपत्ता झाले. रोहिंग्यांच्या दहशतवादी टोळय़ांनी हिंदू आणि बौद्ध समाजाला लक्ष्य करून त्यांची घरं जाळली. खा माऊंग सेईक गावात दहशतवाद्यांनी पुरुष आणि लहान मुलांची चाकूनं भोसकून हत्या केली.

गुन्हेगारांना शिक्षा व्हावी

हिंदू समुदायावर झालेले अत्याचार अत्यंत क्रूर स्वरुपाचे होते. रोहिंग्या दहशतवाद्यांनी शेकडो हिंदूंना ओलीस ठेवले, त्यांच्याच गावाबाहेर महिला आणि मुलांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे क्रूर हत्याकांड घडवून आणणाऱयांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणी ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे संचालक तिरान हसन यांनी केली.

Related posts: