|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अनोख्या प्रकल्पांनी प्रोजेक्ट एक्स्पोला सुरुवात

अनोख्या प्रकल्पांनी प्रोजेक्ट एक्स्पोला सुरुवात 

प्रतिनिधी/ बेळगाव

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना जीआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार तयार केली आहे. त्यामुळे इंधनाची तर बचत होईलच व ही कार चालविण्यासाठी कोणताही खर्च येणार नाही, असे विविध अनोखे प्रकल्प जीआयटी कॉलेजच्या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

गोगटे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे सध्या प्रोजेक्ट एक्स्पो-2018 चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन बुधवारी टाटा कन्सल्टन्सीचे कर्नाटक विभागाचे संचालक श्रीनिवास रामानुजन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. एस. देशपांडे होते. यामध्ये 200 हून अधिक प्रकल्प मांडण्यात आले आहेत.

श्रीनिवास रामानुजन म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता व्यावहारिकदृष्टय़ा अभ्यास करणे गरजेचे आहे. जीआयटी कॉलेजमध्ये अशा प्रकल्पांवर भर दिल्यामुळे कॉलेजमधून उत्तम विद्यार्थी घडत आहेत. अभियंता हा सर्वांपेक्षा वेगळा असल्याने त्याचे कामही सर्वांपेक्षा उठून दिसले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दोन दुचाकी एकमेकांना धडकू नयेत, ती चोरीला जाऊ नये आणि एखाद्या वेळेस चोरीला गेलीच तर ती दुचाकी आपोआप बंद पडेल, अशी अनोखी यंत्रणा विद्यार्थ्यांनी प्रकल्पांतून मांडली आहे. टाकाऊ कचऱयापासून खत निर्मितीचा प्रकल्प उत्तमरित्या मांडण्यात आला आहे. रेल्वेचा रूळ तुटला असल्यामुळे अनेकवेळा अपघात घडतात. हे टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून रेल्वे आपोआप थांबेल, असा प्रकल्प सादर केला आहे. 

Related posts: