|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राजीव गांधी पाणी योजना पडली बंद

राजीव गांधी पाणी योजना पडली बंद 

वार्ताहर/ अथणी

अथणी तालुक्याच्या उत्तर भागात पाण्याची समस्या अद्यापही कायम आहे. पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी राजीव गांधी पाणी योजना सुरू करण्यात आली. पण ती सध्या बंद पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची पाणी समस्या जैसे थे आहे. पाणी योजना बंद पडल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. 

अथणी उत्तर भागात कृष्णा नदीहून राजीव गांधी पाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु नदीस पाणी नसल्याने पाणी योजना बंद पडली आहे.  अथणीचा उत्तर भाग सर्वच दृष्टीने मागास आहे. याकडे संबंधित अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले असून नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या कृष्णा नदीला पाणी आले आहे. मात्र अथणी शहराला पाणी पुरवठा करण्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. शहराची लोकसंख्या 1 लाखाच्या जवळपास असताना पाणी नियोजन करण्याकडे लक्ष न दिलेले नाही. सध्या शहरातील पाणी समस्या सुटली नसल्याने अन्य गावांतील पाणी समस्येचा विचार करणे कठीण बनले आहे.

अनंतपूर-मदभावी जि. पं. मतदारसंघात सर्वांधिक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी कोणीही जात नसल्याने त्या भागाला वाली कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राजकीय नेते समस्या सोडविण्याचे केवळ आश्वासने देतात मात्र उपाययोजना राबविल्या जात नाहीत. वाडय़ावस्तीवर तर पाणी समस्या बिकट आहे. पाण्याचा शोध घेत नागरिकांची मैलोंमैल भटकंती होताना दिसत आहे. याविषयी तालुका अधिकाऱयास कळवूनसुद्धा कोणतीही उपाययोजना राबविलेली नाही.

टँकर सुरू न झाल्यास आंदोलन

सध्या गुंडेवाडी, किरणगी, बाळीगेरी, बेवनूर, अनंतपूर, आजूर, खिळेगाव, शिरुर, संबरगी, जंबगी, खोतवाडी, शिवनूर, जकारटी, विष्णूवाडी या गावात अधिक शिमगा सुरू आहे. सध्या वस्तीवर टँकर आवश्यक आहे. टँकर सुरू करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पाणी पुरवठा करू

सदर समस्येविषयी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पाणी समस्या असणाऱया भागांची पाहणी करण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी पाण्याची सोय करण्यात येईल. शिवाय टँकरची सोय करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.