|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘निपाह’बाबत जनजागृती करा

‘निपाह’बाबत जनजागृती करा 

प्रतिनिधी/ बेळगाव

निपाह या अत्यंत घातक असलेल्या विषाणूमुळे मनुष्य दगावू शकतो. तेव्हा या निपाह संसर्गजन्य आजाराबाबत साऱयांनीच दक्षता घेणे गरजेचे आहे. केरळमध्ये या भयानक आजारामुळे अनेकजण दगावले आहेत. सध्या कर्नाटकात या आजाराचा फैलाव झाला नसला तरी या आजाराबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही जनजागृती करा, या आजारापासून बचाव करण्यासंदर्भात मार्गदर्शन करा, असा आदेश जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाबरोबरच इतर अधिकाऱयांना दिला आहे.

निपाह हा आजार कोणत्याही पक्ष्याने खाल्लेले फळ जर दुसऱया प्राण्याने किंवा व्यक्तीने खाल्ले तर त्याला तो आजार होऊ शकतो. यासाठी कोणीही झाडाखाली पडलेले फळ खाऊ नये, अशी सूचना करण्यात आली. हा आजार संसर्गजन्य आहे. तेव्हा प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. निपाह वटवाघळाच्या माध्यमातून पसरतो. तो इतर पक्ष्यांना किंवा डुक्कर व इतर प्राण्यांना होतो. त्यानंतर या विषाणूचा फैलाव होऊ शकतो. तेव्हा याबाबत प्रत्येकाने जनजागृती करावी आणि सर्वांनाच सतर्क करा, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

सध्या फळांचे जोरदार उत्पादन सुरू आहे. आंबा, फणस, जांभूळ व इतर रानमेवा येत आहे. ग्रामीण भागामध्ये झाडावरून पडलेले फळ खाल्ले जाते. पण अशा फळांमधून निपाहसारखे विषाणू व्यक्तीत जाऊ शकतात. तेव्हा याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागामध्ये अधिक जनजागृती करा, याचबरोबर कोणतेही फळ खाल्लेले असेल तर त्याचा वापर करू नका, असे ग्रामीण भागातील जनतेला समजावून सांगा, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

ग्राम पंचायतींना याबाबत दक्षता घेण्याची सूचना

ग्राम पंचायतींना याबाबत दक्षता घेण्याची सूचना करा, त्याचबरोबर ठिकठिकाणी फलकांची उभारणी करून निपाह विषाणूंची माहिती द्या, त्यापासून घ्यावयाची दक्षता हे सर्वसामान्य जनतेला सांगा. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही व्यक्तीला वारंवार ताप येत असेल तर संबंधित व्यक्तीने त्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या भागामध्ये डुकरांचा व मोकाट कुत्र्यांचा वावर अधिक आहे, त्या भागातील जनतेला अधिक सतर्क राहण्यासाठी सूचना करावी, याचबरोबर मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सांगितले. या रोगाबाबत जनजागृती झोपडपट्टी तसेच बसस्थानक, हॉस्पिटल या परिसरात अधिक करण्यासाठी अधिकाऱयांनी प्रयत्न करा, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. या आजाराबाबत घ्यावयाची दक्षता आणि आजाराची लक्षणे असलेले फलक शहरातील चौकांमध्ये, बसस्थानक, हॉस्पिटल या परिसरात उभे करा, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा शिक्षणाधिकारी उपस्थित नसल्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचा आदेश दिला आहे. शिक्षण विभागातून आलेल्या साहाय्यक अधिकाऱयांची चांगलीच झाडाझडती घेतली. प्रत्येक शाळा, वसतिगृहे या ठिकाणी जाऊन आजाराबाबत जनजागृती करा, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकाऱयांनी त्यांना दिली.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्राम पंचायत या ठिकाणीही या आजाराबाबतचे फलक उभारा, अशी सूचना केली आहे. या बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, जिल्हा आरोग्य अधिकारी आप्पासाहेब नरट्टी, बेळगाव तालुका अधिकारी संजीव नांदे, खानापूर तालुका आरोग्य अधिकारी एस. आर. डुमगोळ, आर. सी. एच. गडाद यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

खानापूर तालुक्मयात अधिक सतर्कता बाळगा

खानापूर तालुक्मयात अधिक जंगल भाग आहे. या तालुक्मयामध्ये फळांचे उत्पादनही मोठे आहे. या तालुक्मयातील जंगल भागामध्ये अनेक गावेही वसलेली आहेत. पक्ष्यांचा वावरही मोठा आहे. तेव्हा या भागातील जनतेने सतर्क रहावे, यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱयांनी जातीने लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी तालुका अधिकारी एस. आर. डुमगोळ यांना दिली आहे.  

Related posts: