|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वैद्यकीय अधिकाऱयाच्या हलगर्जीने महिलेचा मृत्यू

वैद्यकीय अधिकाऱयाच्या हलगर्जीने महिलेचा मृत्यू 

प्रतिनिधी /मिरज :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सौ. वैशाली शैलेंद्र कांबळे (वय 36, रा. तानंग) या महिलेचा गुरूवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे सौ. कांबळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देऊन, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रुग्णालयात तीव्र निदर्शने करण्यात आली. रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन डॉ. शिंदे यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश दिला. या प्रकरणामुळे रुग्णालयात दिवसभर गोंधळाचे वातावरण होते.

गुरूवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास तानंग येथील सौ. वैशाली कांबळे यांना पती शैलेंद्र कांबळे यांनी शासकीय रुग्णालयातील आकस्मिक दुर्घटना विभागात उपचारासाठी दाखल केले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक शिंदे कार्यरत होते. पण, त्यांनी रुग्णाकडे दुर्लक्ष करुन आपल्या सहाय्यकास तपासणी करण्याच्या सुचना दिल्या. सहाय्यकाने सौ. कांबळे यांच्या छातीत दुखत असताना पोटाची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. उपचारासाठी दिरंगाई झाल्याने सकाळी साडेसहाच्या सुमारास सौ. कांबळे या महिलेचा मृत्यू झाला.

या प्रकारामुळे सौ. कांबळे यांचे नातेवाईक संतप्त झाले. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे, तालुकाध्यक्ष सचिन कांबळे, उमेश धेंडे, सागर कांबळे, नितीन कांबळे, शिवाजी कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जावून तीव्र निदर्शने केली. यावेळी महिला आणि सौ. कांबळे यांचे नातेवाईक मोठय़ा संख्येने रुग्णालयात जमा झाले होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे सौ. कांबळे यांचा मृत्यू झाल्याने त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत रुग्णालय आवारातच नातेवाईक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार देण्यात आला होता.