|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात एसटी बस दरीत कोसळली

चिपळुणात एसटी बस दरीत कोसळली 

आंब्याच्या गाडीला धडक दिल्यानंतर मद्यधुंद चालकाचा ताबा सुटल्याने घडला प्रकार

5 प्रवाशांसह चालक जखमी, वाहकानेही केले होते मद्यप्राशन

वैद्यकीय अहवालात स्पष्ट

 

प्रतिनिधी /चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात मद्यधुंद एस. टी. बस चालकाने आंबा भरलेल्या बोलेरो गाडीला धडक दिली व त्यानंतर ही बस 30 फूट दरीत कोसळल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजता घडला. यात चालकासह 5 प्रवासी जखमी झाले. या अपघातात आंबा मालकाचे सुमारे 2 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, बसचालकाबरोबरच वाहकानेही मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

बाळकृष्ण हरिश्चंद्र चव्हाण (39, बसचालक-देवगड आगार), जयश्री राजाराम रहाटे (70), सुनिता सुहास तेली (42), रसिका तेली (तिघीही जोगेश्वरी-मुंबई), जयश्री जयंत गोखले (49, बाकाळे-राजापूर), मयुर शिवसेकर अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर येथील लाईफकेअर रूग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

चव्हाण हे बोरिवली-देवगड ही बस चिपळूण ते देवगड अशी घेऊन जात असताना कामथे घाटात अमोल गणपत वाडेकर (31, देवगड किल्ला-सिंधुदुर्ग) हा बोलेरो गाडीतून आंबा घेऊन मुंबईकडे जात असताना चव्हाण यांनी त्याच्या गाडीला समोरासमोर जोरदार धडक दिली. यात बोलेरोचे व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस काही किलोमीटरवर जाऊन त्यानंतर 30 फूट दरीत कोसळली. यात चालकासह 5 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चालक अटकेत

या अपघाताची खबर वाडेकर याने पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार चालक चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या बाबतचा अधिक तपास हे. कॉ. डी. व्ही. विभूते करीत आहेत.

बस मुंबईत जातेय

अपघातानंतर चालक व वाहकाला बस कुठे जात होती, असे पोलिसांनी विचारले असता त्यांनी बस मुंबईत जात असल्याचे सागितले, तर प्रवासी बस देवगडला जात होती, असे सांगत होते. त्यानंतर फलक पाहिला असता तो बोरिवली-देवगड असा होता. त्यामुळे चालक-वाहक असे का सांगतात, असा प्रश्न पोलिसांना पडला. अखेर या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात ते स्पष्टच झाले. त्यामुळे हा वैद्यकीय अहवाल एसटी महामंडळाला पाठवला जाणार आहे. त्यामुळे या दोघांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.