|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » घर बसल्या शेतातील आग आटोक्यात आणता येणार!

घर बसल्या शेतातील आग आटोक्यात आणता येणार! 

आंबव महाविद्यालयातील प्रा. लक्ष्मण नाईक यांनी तयार केले अफलातून बहुद्देशीय यंत्र

शेतकऱयांना ठरणार वरदान

दीपक कुवळेकर /देवरुख

शेतात कोणी नसताना आग लागली तर बहुसंख्यवेळा शेती जळून नष्ट होते. कारण शेती ही घरापासून दूर असते. त्यामुळे आग लागलेली लवकर समजत नाही. मात्र लागलेली आग शेतकऱयाला कुठेही असताना समजावी व ती आटोक्यात आणता यावी, यासाठी अफलातून अशा यंत्राची निर्मिती संगमेश्वर तालुक्यातील आंबव राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक लक्ष्मण नाईक यांनी केली आहे. शेतात आग लागली तर अलाराम वाजेलच, पण शेतकऱयाच्या मोबाईलवर मेसेज जाईल. तसेच ही आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची यंत्रणा सुरु होणार आहे. हे यंत्र शेतकऱयांना वरदान ठरणार आहे.

सध्या वणव्यांचे प्रमाण खूप आहे. यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. काहीवेळा या आगीत पूर्णपणे शेतीच्या शेती नष्ट होत आहे. यामुळे शेतकरी सध्या चांगलेच हतबल झाले आहेत. बहुसंख्य शेतीही घरापासून दूर असल्याने रात्री किंवा दिवसाही आग लागलेली शेतकऱयाला समजत नाही. यामुळे आग लागलेली असताना शेतकरी काहीच करु शकत नाही. मात्र यावर आता आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक लक्ष्मण नाईक यांनी अफलातून असा उपाय काढला आहे. एका यंत्राची निर्मिती केली असून विशेष म्हणजे याची दखल मुंबई विद्यापीठाने घेतली आहे.

या यंत्राव्दारे शेतात जर आग लागली तर प्रथम अलाराम वाजणार आहे. तसेच शेतकऱयाच्या मोबाईलवर मेसेजही जाणार आहे. शेतात ठिबक सिंचनसारखी यंत्रणा त्वरित सुरु होणार आहे. जेणेकरुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे शेतकऱयाला हे यंत्र वरदान ठरणार आहे. हे यंत्र बहुद्देशीय असून याचा शेतकऱयांना अनेक गोष्टीसाठी फायदा होणार आहे. शेतात जमिनीचा ओलावा संपला तर त्वरित ठिबक सिंचन यंत्रणा सुरु होणार आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय थांबणार आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा मनुष्यविरहित चालू शकते.

आणखीही एका यंत्राची निर्मिती

तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱयांना या यंत्राचा लाभ व्हावा व त्यांचे जीवनमान उंचावे, त्यासाठी याची निर्मिती करण्यात आल्याचे प्रा.लक्ष्मण नाईक यांनी सांगितले. यासाठी संस्थाध्यक्ष रवींद्र माने व महाविद्यालयाचे प्राचार्य महेश भागवत यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे नाईक यांनी सांगितले. या यंत्राबरोबरच त्यांनी आणखीही यंत्राची निर्मिती केली आहे. यामध्ये घरात एलपीजी गॅस लिकेज झाला तर त्याचा त्वरित अलाराम वाजणार आहे. यामुळे हे ही यंत्र तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

प्रकल्पाला विद्यापीठातर्फे अनुदानाची घोषणा

मुंबई विद्यापीठातर्फे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अत्याधुनिक संशोधनाला चालना मिळावी, या उद्देशाने विविध संशोधन प्रकल्पांची दरवर्षी निवड करण्यात येते. यावर्षी लक्ष्मण नाईक यांच्या या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला विद्यापीठातर्फे अनुदानाची घोषणाही करण्यात आली आहे.

Related posts: