|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची सोलापूर जिह्यात ड्रायपोर्ट उभारण्याची मागणी

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची सोलापूर जिह्यात ड्रायपोर्ट उभारण्याची मागणी 

प्रतिनिधी/ सोलापूर

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रस्ते, वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सोलापूर जिह्यात ड्राय पोर्ट व निर्यात सुविधा केंद्र उभारण्यासंदर्भात पत्र देऊन सकारात्मक चर्चा केली. दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी सुभाष देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन जिह्यात ड्राय पोर्ट व शेतकरी उत्पादित माल विक्रीसाठी परिसरात निर्यात सुविधा केंद्र होण्यासंदर्भात तसेच सोलापूर जिह्यातील सुरु असलेल्या विकास कामांबद्दल व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटी दरम्यान नवीन प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व उद्योग व्यवसायाला पूरक सोयी-सुविधांमुळे सोलापूरच्या वैभावात भर पडेल. यासाठी जहाज बांधणी खात्याकडून ड्राय पोर्ट उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी मागणी सुभाष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ, त्रिहे, बेगमपुर, टाकळी येथे मंजुरी मिळालेल्या ब्रिज कम बंधाऱयाच्या कामाला गती देण्यासंदर्भात चर्चा केली.

ड्राय पोर्टची निर्मिती झाल्यास सोलापुर जिह्यातील प्रमुख उत्पादन कापड, डाळिंब, द्राक्ष, केळी व इतर वस्तूंच्या निर्यातीसाठी सोयीचे ठरेल, यामुळे वेळेची बचत होईल. सध्या ड्राय पोर्टसाठी मुंबई-हैद्राबाद, मुंबई-विजापूर अशा ठिकाणातून निर्यात होत असून सोलापुरात हे प्रकल्प आल्यास व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल व यामुळे जिह्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत मिळणार आहे. तसेच परिसरात निर्यात सुविधा केंद्रामुळे शेतकरी उत्पादित मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. यामुळे सोलापुरातील व्यावसायिक व महाराष्ट्रातील शेतकयांच्या दृष्टीने महत्वाची मागणी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

बंधाऱयाच्या कामाला गती देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा

दुष्काळी भाग असणाऱया दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. राज्य शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेतून मागील दोन वर्षात अनेक कामे झाली आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या भेटीदरम्यान  सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी वडकबाळ, त्रिहे, बेगमपुर, टाकळी येथे मंजूर झालेल्या ब्रिज कम बंधाऱयाच्या कामाला गती देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली.