|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कर्नाटकात सत्तेचं सिंहासन ‘डळमळीत’ राहील

कर्नाटकात सत्तेचं सिंहासन ‘डळमळीत’ राहील 

महेश शिंपुकडे/ निपाणी

राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांटय़ा उडय़ा मारतील. सत्ता व संपत्तीच्या मागे लागतील. राजकारणात पैसा न खाणारा नेता सापडणे अवघड होईल. लाचलुचपत भ्रष्टाचाराला उधाण येईल. मोठे नेते भ्रष्टाचारात अडकून राहतील. तुरुंगात जातील. राजकारणी देवधर्म विसरतील. नेत्यांची पळवापळवी होईल. कर्नाटकाच्या राजकारणात उलथापालथ होईल. सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील, अशी नाथांची भाकणूक कृष्णात डोणे महाराज यांनी कथन केली.

निपाणी-अकोळ रोडवरील श्रीपेवाडी क्रॉस येथील हालसिद्धनाथ मंदिराचा 22 वा वर्धापन दिन व यात्रा उत्सव शुक्रवारी उत्साहात पार पडला. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने देव आणणे, आंबील कलश मिरवणूक, अभिषेक, पूजाविधी, ढोलवादन, भंडाऱयाची उधळण, हत्यार खेळविणे असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. याचवेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, हवामान, देवाचे सत्पन, देश-विदेशात घडणार असलेल्या घटनांचा भाकणुकीतून घोषवारा केला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

बांदाआड बांद, शिवाआड शिव, रोहिणीचा पेरा जसा मोत्याचा तुरा, सादल तो सज्जन, हातात भाकरी, खांद्यावर चाबूक, साधल सोबती, सरता मृग निघती आडद्रा, मध्यम फाटय़ाचा पेरा होईल, सरत्या आडद्रा निघता तरण अल्लम दुनियेचा पेरा होईल, कुरी थाऱयाला बसल. जमिनीत धान्य बहुतेक बेमान राहील, तांबडी रास मध्यम पिकल, मोलानं विकल.

द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा आहे. ते संपूर्ण दुनियेला न्याहाळत आहे. त्याच्या मागं अंधार पुढं अंधार अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रीय हाय. ती गादी धर्माची हाय. धर्माच्या गादीला रामराम करा. हालसिद्धनाथांचा जयजयकार करा. फार पूर्वीपासून सविना सोहळा चालतोय. निपाणीची श्रीक्षेत्राची महती वाढत जाईल. यातून प्रतिआप्पाचीवाडी क्षेत्र निर्माण होईल.

रसायन भांडं उदंड पिकंल. रसाला धारण माणसाला मरण अशी स्थिती निर्माण होईल. उसाचा काऊस होईल. मांडवाच्या दारी 3500 म्हणशीला 3300 वर येईल, 3300 वरून 3 हजारावर येईल, साखरेच्या दरात तेजी-मंदी राहील. गुळाचा भाव उच्चांक गाठेल, शुगर फॅक्टरिचा मॅनेजर आनंदात राहील. साखर सम्राटांची खुर्ची डळमळेल. उसाच्या कांडय़ानं दुधाच्या भांडय़ानं राज्यात गोंधाळ होईल. आंदोलन पेटतील. शेतकरी चिंतेत राहील.

मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद

पांढरं धान्य उदंड पिकल, सफल जाईल, गव्हाची पेंडी मध्यम पिकल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. वैरण कोपऱयात ठेवशीला, वैरण सोन्याची होईल, सांभाळून ठेवा. वैरण, धान्याच्या चोऱया होतील. बैलाची किंमत बकऱयाला येईल. बकऱयाची किंमत कोंबडय़ाला येईल. कोंबडा मनुष्याच्या पाठी लागंल. धनगराची पोरं मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारतील. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद राहील.

बुद्धी जास्त पण आयुष्य कमी

तंबाखू मध्यम पिकंल, मोलानं विकंल. पण तंबाखूचा बंबाखू होईल. भाव तेजीमंदीत राहतील. तंबाखूच्या सेवनाने मनुष्याला आजार होतील. तंबाखूपासून दूर रहा. कळपातला बकरा कळपात लढंल. लढून खेळंल. मातेचं लेकरू मातेला ओळखणार नाही. गायीचं वासरू गाईला भेटणार नाही. घरातून गेलेला मनुष्य परत घरी येण्याची अपेक्षा ठेवू नका. ठेचेला मरण आहे. माणसानं धर्मानं जगावं. मनुष्याला बुद्धी जास्त पण आयुष्य कमी हाय. अठरा तऱहेच्या आजारामुळे डॉक्टर लोक हात टेकतील. ऐकावं ते नवल ठरेल. पैसा, दागिने मनुष्यासाठी धोका ठरतील.

तरुण पिढी वाममार्गाला लागंल

जगात पुण्य कमी पण पाप वाढलंय. भावाला बहीण ओळखेना. सासऱयाला सून ओळखेना. डोंगराएवढी पापं आणि दोऱयाएवढे पुण्य शिल्लक राहीलंय. जगात धर्म बुडून गेला. पण धर्माची बाजूच महत्त्वाची हाय. नऊ वर्षाची मुलगी भ्रतार मागंल. बारा वर्षाची मुलगी आई होईल. तरुण पिढी वाममार्गाला लागंल. उगवत्या सूर्याला मोठं संकट पडलंया.

उन्हाळय़ाचा पावसाळा तर पावसाळय़ाचा उन्हाळा

नीतिमत्ता बुडून जात आहे. वरिष्ठांचा मानसन्मान कमी होतोया. पंचलोक भ्रष्टाचारात बुडून गेलेत. दोन्हीकडचे पैसे खाऊन भांडण लावताहेत. कागदाचा घोडा माणसाला खुळं करतोया. दुष्काळ पडेल. नद्यांना कुलूप लागतील. उन्हाळय़ाचा पावसाळा तसा पावसाळय़ाचा उन्हाळा होईल.

Related posts: