|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सविताच्या गर्भपात मृत्यू प्रकरणी 6 वर्षांनंतर जनमत चाचणी

सविताच्या गर्भपात मृत्यू प्रकरणी 6 वर्षांनंतर जनमत चाचणी 

प्रतिनिधी / बेळगाव

ऐन दिवाळीत आमच्या घराची ज्योत निमाली, आमच्या घरातच नव्हे तर जीवनातही अंधार पसरला. त्यानंतर अनेक दिवाळी आल्या आणि गेल्या, पण आम्ही आमची ज्योत कायमचीच गमावली. आज तिच्या बलिदानामुळे आयर्लंडमध्ये गर्भपाताच्या कायद्यातच बदल होण्याची सुचिन्हे दिसत आहेत. आमची मुलगी गेल्याचे दु:ख तसुभरही कमी झाले नाही. परंतु ते उरामध्ये ठेवूनही यापुढे आणखी कोणत्याही स्त्राrवर असा दुर्दैवी आघात होवू नये, एवढीच आमची इच्छा आहे.

कोणाच्याही भावनांना हात घालेल असे हे मनोगत आहे सविता हालप्पण्णावर यांच्या वडिलांचे. म्हणजेच अंदानप्पा याळगी यांचे. ही बातमी वाचताना आपल्याला सहा वर्षे मागे जावे लागेल. ऐन दिवाळीत 28 ऑक्टोबर रोजी आयर्लंड येथे सविताचा मृत्यू झाला. सविता गर्भवती होती. तिला कळा सुरू झाल्याने दिवस भरण्यापूर्वीच आयर्लंडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तिच्या प्रकृतीत गुंतागुंत वाढु लागल्याने तिने स्वतःच डॉक्टरांना गर्भपात करण्याची विनंती केली. सविता पेशाने दंतवैद्य होती. त्यामुळे अर्थातच वैद्यशास्त्राशी ती परिचित होती.

लेबर रुममध्ये सविताने डॉक्टरांना गर्भपात करण्याची विनंती सातत्याने केली. तिचे पती प्रवीण यांनीही सहमती दर्शविली. परंतु आयर्लंडमध्ये गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असे सांगून डॉक्टरांनी गर्भपातास नकार दिला. सविताची प्रकृती अधिकच खालावली. गुंतागुंत वाढली. परिणामी सविता दगावली. सविताच्या या मृत्यूने तिच्या पतीवर आणि पालकांवर दु:खाची कुऱहाडच कोसळली. त्यापेक्षा ज्या कारणास्तव सविताचा गर्भपात नाकारला गेला त्याबद्दल चीड निर्माण झाली. जगभरातील माध्यमांनी या घटनेची नोंद घेतली. वृत्तांकन केले आणि आयर्लंडच्या या कायद्याबद्दल जगभरातच निषेधाचे पडसाद उमटले.

यानंतर तर कायदा बदलावा, यासाठी आयर्लंड सरकारवर दबाव येवू लागला. या कायद्यात खरोखरच बदल करावा का? यासाठी जनमत घेण्याचे ठरले. 25 मे 2018 रोजी याबाबत जनमत चाचणी सुरू झाली. जनमताच्या बाजुने निर्णय घेण्यास सरकार बांधील आहे. त्यामुळे सविताच्या बाजुने जनमत असेल असा विश्वास सविताचे वडील अंदानप्पा याळगी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.

बेळगावच्या सविता याळगी यांचे प्रवीण हाल्लप्पण्णावर यांच्याशी लग्न झाले आणि त्या आयर्लंडला गेल्या. प्रवीण अभियंता म्हणून काम करत होते तर सरिता दंतवैद्य होती. 29 सप्टेंबर 1981 ला जन्म झालेल्या सविता यांचे शिक्षण बेळगावमध्येच झाले. केएलई डेंटल कॉलेजमध्ये त्यांनी पदवी घेतली. 19 एप्रिल 2008 रोजी त्यांचे लग्न झाले व त्या पतीसमवेत आयर्लंडला गेल्या. आई होण्याची चाहुल लागल्यानंतर हरकून गेलेल्या सविता यांना गर्भार्पर्णी त्रास होवू लागला आणि गर्भपात बंदी कायद्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

तेंव्हापासून या कायद्यामध्ये बदल व्हावा, अशी मागणी सविताच्या पालकांनी केली आहे. तथापि आयर्लंडमधील नागरिकांनी या मागणीला जोरदार पाठिंबा दिल्याने तब्बल 6 वर्षांनी सरकारला त्याबाबत जनमत घ्यावे लागले. शुक्रवारी सकाळी 8 पासून दुपारी 4 पर्यंत जनमत प्रक्रिया पार पडली. तेथील लोकांनी आपल्याशी संपर्क साधून आपला पाठिंबा व्यक्त केला. आम्हाला धीर दिला. हे पाहता सविताच्या बाजुने कायदा होईल, असे अंदानप्पा यांना वाटते. 

आयर्लंडचे अध्यक्ष भारतीय वंशाचे

दरम्यान, आयर्लंडचे विद्यमान अध्यक्ष लिव्हो वरदरकर हे भारतीय वंशांचे असून ते मराठी आहेत. सविताची अवस्था आणि पालकांची मनस्थिती पाहता त्यांनी जनमत घेण्यास अनुकुलता दर्शविली असावी, असेही अंदानप्पा सांगतात. 

प्रवीणच्या विवाहाला पाठिंबा

दरम्यान, सविताचे पती प्रवीण हे सध्या नेदरलँडमध्ये असून त्यांचा विवाह झाला आहे. प्रवीण यांचे वय लहान आहे. त्यांच्या विवाहाला आमचा पूर्ण पाठिंबा होता. ते सुद्धा आम्हाला अधूनमधून फोन करून आमची विचारपूस करतात, असे सविताच्या आई अक्कमहादेवी याळगी यांनी सांगितले.

Related posts: