|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गायरान जमिनीतील अतिक्रमण थांबवा

गायरान जमिनीतील अतिक्रमण थांबवा 

प्रतिनिधी / बेळगाव

खनगाव खुर्द गावातील गायरान जागेमध्ये अतिक्रमण करून ती बळकावण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. यामुळे गावकऱयांसमोर मोठी समस्या निर्माण झाली असून  हा प्रयत्न तातडीने थांबवावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.

खानगाव खुर्द येथील सर्व्हे नंबर 7, 9, 12 व इतर सर्व्हे नंबरमधील 28 एकर जमिनीमध्ये हे अतिक्रमण करण्यात आले आहे. पोलीस फौजफाटा घेऊन ही जमीन बळावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही जमीन ग्रामस्थांना महत्वाची असून ती  जनावरांना चरण्यासाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा जनावरांना चरण्यासाठी जागाच राहणार नाही.

सदर जमीन देताना गावकऱयांना कधीच विश्वासात घेण्यात आले नाही. महत्वाचे म्हणजे खानगाव खुर्द हे गाव पूर्ण शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱयांनी शेतीबरोबर दुधासाठी जनावरे पाळली आहेत. शेतीबरोबर हा व्यवसाय केला तरच  शेतकरी जीवन जगू शकतो. अन्यथा जीवन जगणे कठीण जाणार आहे. जनावरे पाळली तर त्यांना चरण्यासाठी गायरान जागा असणे अत्यावश्यक आहे. तेव्हा अशाप्रकारे गायरान जागेमध्ये अतिक्रमण झाल्यास शेतकरी देशोधडीला लागणार आहे.

जिल्हाधिकाऱयांनी तातडीने याबाबत पाऊल उचलावे आणि होणारे अतिक्रमण थांबवावे, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करू, अशा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रकांत  पाटील, महेश पाटील, यल्लाप्पा कुरबर, बसवाणी पाटील, लक्ष्मण हिंदीनकेरी, बसू लोहार, शेखर बेळगावकर, शंकर पाटील, सोमनाथ शिंदे, प्रकाश पाटील, किरण पाटील, मारुती कोनसेकोप्प, वेंकण्णा पाटील, हसन मुल्ला यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: