|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहरात आता ई-टॉयलेटची निर्मिती

शहरात आता ई-टॉयलेटची निर्मिती 

बेळगाव / प्रतिनिधी

स्वच्छ भारत योजनेंतर्गत शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. स्मार्ट सिटी योजनेमध्ये बेळगाव शहराचा समावेश असल्याने या योजनेंतर्गत शहरामध्ये रस्ते बांधणी, आकर्षक पथदीप बसविणे, भूमिगत वीजवाहिन्या घालणे, शहरातील ट्राफिक सिग्नल नव्याने बसविणे यासारखी कामे सुरू आहेत. मात्र, स्वच्छतेचा डांगोरा पिटण्यात येत असताना महिला स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. याचा विचार करून प्रशासनाने शहरात ई-टॉयलेट बसविण्याची संकल्पना विचारात आणली असून त्याचे काम सध्या शहरात सुरू झाले आहे.

  महापालिकेतर्फे शहरात तीन ठिकाणी ई-टॉयलेट बसविण्यात आले आहेत. महिनाभरात आणखी चार ठिकाणी ई-टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. तसेच ई-टॉयलेटचे काम हे मुख्यमंत्री विशेष साहाय्यता निधीतून होत असून यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती महापालिकेचे पर्यावरण अभियंता उदय कुमार यांनी दिली.

   या  ई-टॉयलेटचा वापर बेळगावकरांना जून अखेरपर्यंत करता येणार आहे. या ई-टॉयलेटचा वापर पाच रुपयाचे नाणे टाकल्यानंतरच करता येणार आहे. शहरात शेरी गल्ली, आंबेडकर रोड येथील जिल्हा रुग्णालयासमोर तसेच किल्ला तलाव परिसर येथे ई-टॉयलेट उभारण्यात आली आहेत. तसेच श्रीनगर उद्यान व गोवावेस जलतरण तलाव येथे ई-टॉयलेट उभारण्याचे काम सुरू आहे.

 बेळगाव शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा आहे. त्यामुळे महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. या समस्येवर ई-टॉयलेटच्या माध्यमातून मात करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. ई-टॉयलेट ठेवण्यासाठी व त्यासाठी लागणारे प्लॅटफॉर्मचे बांधकाम, शेड, नळजोडणी, वीजपुरवठा आदी कामे कोणी करायची याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. कंत्राटदाराने केवळ ई-टॉयलेट्सचा पुरवठा करण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे राहिलेली कामे पूर्ण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामांचे कंत्राट देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. पण त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नसल्याने हे काम उशिराने सुरू झाले आहे. शहरात इतर ठिकाणी देखील ई-टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू असून स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत बेळगाव शहर हागणदारीमुक्त करण्याचे पालिका प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.  

Related posts: