|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मातृभाषेचे बोल थेट अत:करणात साद घालतात

मातृभाषेचे बोल थेट अत:करणात साद घालतात 

वार्ताहर/ सावईवेरे

मातृभाषा हीच सर्वाधिक लोकप्रिय असून या भाषेचे बोल थेट अ:तकरणात साद घालतात. कोकणी भाषा पुढे नेण्यासाठी ज्येष्ठ साहित्यीकांचा मोलाचा वाटा आहे. आजच्या तरूण पिढीने या भाषेचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्रामिण विकास मंत्री जयेश साळगांवकर यांनी केले. वळवई-सावईवेरे येथील कोकणी मेळ महोत्सवात ते बोलत होते.

कला व संस्कृती खाते व गोवा राजभाषा संचलनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पेलेल्या सहाव्या वासंतिक साहित्य व कला मेळ 2018 चा उद्घाटन सोहळा येथील मदनंत सभागृहात थाटात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर ग्रामिण विकास मंत्री जयेश साळगांवकर, प्रमुख पाहूणे ज्येष्ठ साहित्यीक दामोदर मावजो, अध्यक्षस्थानी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सरपंच सत्यवान शिलकर, कार्याध्यक्ष राजदीप नाईक, स्वागताध्यक्ष संदीप निगळय़े, अध्यक्ष विनंती कासार व संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नाईक उपस्थित होते.

यावेळी दामोदर मावजो हे बोलताना म्हणाले घोकमपट्टीचे उच्च शिक्षण घेत संवेदना जागृत होत नसतात, मनात संवेदना व संस्कृती जागृत करण्यासाठी साहित्याची गोडी लागणे हे अत्यंत महत्चाचे आहे. साहित्यात मोठा बदल घडवून आणण्याची ताकद आहे. यासाठी अशा मेळाव्याच्या आयोजनाने युवा पिढीला एकजूट करण्याचे काम करावे.

जयेश साळगांवकर यानी गोय, गोयकार व गेंयकारपण हा जो मंत्र आपल्या पक्षाने गोमंतकीयांना दिला आहे तो पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

मंत्री गोविंद गावडे यांनी माणसांचे जीवन यशस्वी होण्यासाठी त्य़ाच्यामध्ये असलेली तळमळ,गोडी व मानसिकता गरजेची आहे. आज कोकणी साहित्याचा अन्य भाषेत अनुवादन होत आहे ही गोष्ट अभिमानास्पद असल्याचे सांगताना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे असे प्रतिपादन केले.

प्रकाश नाईक यांनी कोकणी मेळ या संस्थेच्या हेतू स्पष्ट केला. संदीप निगळय़े यानी स्वागत करताना कोकणीची चळवळ पुढे नेण्याचे आवाहन केले. विनंती कासार यांनी मेळाव्याच्या गरज यासंबंधी माहिती दिली. राजदीप नाईक, सत्यवान शिलकर यांनीही विचार मांडले. यावेळी ‘पणटीयार’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यीक पुंडलिक नायक, हेमा नायक, संजीव केरकर, पांडुरंग गावडे श्रीनीशा नाईक यांचा सत्कार करण्यात आला. त्याशिवाय कै. शंभू खेडेकर, कै. अवधूत कामत, कै. रोहिदास तारी, कै. एकनाथ नाईक व कै. डॉ. मेजर प्रकाश शेटय़े यांचा मरणोत्तर सत्कार करण्यात आला. रेश्मा नाईक व बाबलो शिलकर यांनी सुत्रसंचालन तर हिरू नाईक यांनी आभार मानले.