|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » नाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

नाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश 

ऑनलाईन टीम / नाशिक :

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नाशिक पोलिसांना यश मिळाले आहे. मुख्य सूत्रधाराच्या पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. एमडी ड्रग्स तयार करून त्याची विक्री करणाऱया एका असिस्टंट रिसर्च सायंटीस्टला नाशिक क्राईम ब्रँचने उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगरमधून अटक केली.

एमडी ड्रग्जची जिथे निर्माण केली जात होती, तो पालघर जिह्यातील बोईसरमधील ठिकाण देखील पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. 16 मे रोजी पाथर्डी फाटा परिसरातून नाशिक गुन्हे शाखा एकच्या पथकाने एका सफारी कारमधून प्रवास करणाऱया रणजित मोरे, पंकज दुंडे आणि नितीन माळशेदे या तिघांकडून 265 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत केले होते. त्यांच्यावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु असतानाच एमडी ड्रग्जच मुंबई कनेक्शन समोर येताच पोलिसांच एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झालं आणि त्यांनी मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात सापळा रचून नदीम सलीम सौरठिया आणि सफैउल्ला फारूक शेख या दोघांना अटक करत, त्यांच्याकडून 44 लाख रूपये किमतीचे तब्ब्ल 2200 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले होते. हे ड्रग्स ते ज्या व्यक्तीकडून खरेदी करत होते, तो अरविंद कुमार मुझफ्फरनगरमध्ये फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी क्राईम ब्रँचचे एक पथक मुझफ्फरनगरला रवाना झाले होते आणि अखेर सापळा रचून त्याच्या मुसक्मया आवळण्यात त्यांना यश आले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच साथीदाराच्या मदतीने त्याने बोईसर मध्ये एका घरातच एमडी ड्रग्स बनवण्याची प्रयोगशाळा सुरू असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांच्या दुसऱया पथकाने बोईसर गाठत अरविंदकुमारचा साथीदार हरिश्चंद्र पंत याला ताब्यात घेत, 4500 ग्रॅम एमडी ड्रग्ज, एम डी तयार करण्यासाठी लागणारी 18 किलो क्रूड पावडर आणि प्रयोगशाळेतील इतर साहित्य असा एकूण 1 कोटी 80 लाख 47 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. विशेष म्हणजे यातील मुख्य सूत्रधार अरविंदकुमार हा मागील 10 वर्षांपासून फार्मासुटिकल क्षेत्रात काम करत असून त्याने एमएससी (ऑरगॅनिक केमिस्ट्री) च शिक्षण घेतले आहे. त्याने असिस्टंट रिसर्च सायंटीस्ट म्हणून देखील काम केल्याच पोलीस तपासात समोर आले, तर अरविंदकुमारचा साथीदार हरिश्चंद्र पंत हा देखील बीएस्सीच शिक्षण घेत असून तो देखील एका कंपनीत नोकरीस आहे.

एकंदरीतच 16 मे ते 26 मे या दहा दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी ही सगळी कारवाई करत एकूण 7 आरोपींना बेडय़ा ठोकल्या आहेत, तर 25 किलो एमडी ड्रग्ज, 90 लाख रूपयांची जॅग्वार सह एक सफारी कार आणि इतर साहित्य असा एकूण 3 कोटी 20 लाख 88 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यात पोलिसांना यश जरी आले असले तरी या प्रकरणी कच्चा माल पुरवठादार आणि या एमडी ड्रग्सची खरेदी विक्री करणाऱया इतर साथीदारांकडे पोलिसांच्या तपासाची आता चपे फिरणार आहेत.