|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मातृभाषेबद्दलची निष्ठा पारदर्शक हवी

मातृभाषेबद्दलची निष्ठा पारदर्शक हवी 

वार्ताहर /सावईवेरे

कोणत्याही राज्याची संस्कृती ही आपल्या मातृभाषेतूनच फुलते. सरकारचे कोकणी भाषेविषयीचे धोरण तसेच प्रत्येक गोमंतकीयाची आपल्या मातृभाषेबद्दलची निष्ठा पारदर्शक असायला हवी. कोकणी भाषेचा विकास होण्यासाठी प्रत्येकाने निष्ठेने आणि जागृतपणे कार्य करण्याचे आवाहन ज्येष्ठ कोकणी साहित्यिक नागेश करमली यांनी केले.

वळवई सावईवेरे येथील कोकणी मेळ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या वासंतिक साहित्य आणि कला मेळाव्याच्या समारोप सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कला आणि संस्कृती खाते व गोवा राजभाषा संचालनालय यांच्या संयुक्त सहकार्याने सावईवेरे येथील श्री मदनंत सभागृहात हे दोन दिवशीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी या संमेलानाची सांगता झाली. व्यासपीठावर खास निमंत्रित म्हणून नेहरु युवा केंद्राचे तन्मय आचार्य, स्वागताध्यक्ष संदीप निगळय़े, कार्याध्यक्ष राजदीप नाईक, अध्यक्ष विनंती कासार व कोकणी मेळचे अध्यक्ष प्रकाश नाईक हे उपस्थित होते.

श्री. करमली पुढे बोलताना म्हणाले, कोकणी भाषेत कथा, कविता, नाटक अशा सर्वप्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. सावईवेरे व वळवई गावाने साहित्य व नाटय़क्षेत्रात अनेक नामवंत लेखक दिले आहेत. ज्याप्रमाणे इतर राज्यात आपल्या मातृभाषेच्या संवर्धन व संरक्षणासाठी प्रयत्न केले जातात, तसे गोव्यात दिसत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवे, असे सांगून मातृभाषेला नवीन बळ व उर्जा देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

तन्मय आचार्य म्हणाले, आजच्या युवा पिढीमध्ये नेतृत्त्व क्षमता घटत चालली आहे. प्रतिभेचे प्रदर्शन खूपच कमी होताना दिसते. युवावर्गाच्या प्रगतीसाठी व त्यांना प्रतिभावंत तसेच सक्षम बनविण्यासाठी नेहरु युवा केंद्र हे योग्य माध्यम आहे. संदीप निगळय़े, प्रकाश नाईक, विनंती कासार व राजदीप नाईक यांची यावेळी भाषणे झाली.

विठ्ठल नाईक व अरुची नाईक यांनी सूत्रसंचालन केले. हिरु नाईक यांनी आभार मानले. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान व नेरु युवा केंद्र, दक्षिण गोवा  यांच्यातर्फे ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट दाखविण्यात आला.