|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » चाचा चौधरींच्या माध्यमातून मोदींची जाहिरातबाजी,शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडले; सुप्रिया सुळें

चाचा चौधरींच्या माध्यमातून मोदींची जाहिरातबाजी,शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडले; सुप्रिया सुळें 

पुणे / प्रतिनिधी :

लोकप्रिय चाचा चौधरींच्या काटूर्नस्च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी शालेय अवांतर वाचनाच्या पुस्तकातून आपली जाहिरातबाजी करीत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे केला. शिक्षण विभाग विनोदाच्या तावडीत सापडल्याची खरमरीत टीकाही त्यांनी केली.

याबाबत सुळे म्हणाल्या, शालेय मुलांच्या अवांतर वाचनाच्या पुस्तकात सरकारच्या विविध योजना तसेच स्वच्छतेबाबत उत्तम संदेश दिले आहेत. मात्र, तिथे मोदींनी स्वतःचे फोटो छापून आपला प्रचार केला आहे. स्वच्छतेच्या संदेशात मोदींऐवजी संत गाडगेबाबांचे फोटो या पुस्तकात असायला हवे होते. आजपर्यंत कोणत्याही पक्षाने शिक्षणात अशाप्रकारे राजकारण आणले नव्हते. मोदी सरकारचे आजपर्यंतचे काम या पुस्तकामध्ये मांडण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी 20 तास काम करतात. देश वेगाने बदलत आहे, अशी माहितीही या पुस्तकात देण्यात आली आहे. तसेच उघडय़ावर शौचास बसू नका, स्वच्छता राखा तसेच घरात शौचालय बांधा यासारखे संदेशही कॉमिक्सच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. नोटाबंदीचे यश, जीएसटीची अंमलबजावणी आणि डिजिटल इंडियाचा संदेशही यात देण्यात आला आहे.

राज्याच्या शिक्षण खात्यामध्ये सध्या निव्वळ विनोदी कारभार सुरू असून, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे. शिक्षण क्षेत्रात राज्य सोळाव्या क्रमांकावरून तिसऱया क्रमाकांवर पोहोचल्याचा दावा मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री करीत आहेत. हा दावा कोणत्या आधारावर केला याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.