|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनच्या दौऱयावर जाणार इराणचे राष्ट्रपती

चीनच्या दौऱयावर जाणार इराणचे राष्ट्रपती 

बीजिंग

इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी पुढील महिन्यात चीनमध्ये आयोजित होणाऱया शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी सोमवारी याबद्दलची माहिती दिली. 9 आणि 10 जून रोजी किंग्दाओ शहरात चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची रुहानी भेट घेणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन देखील या परिषदेत सामील होणार आहेत.

एससीओ परिषदेत इराण अणू करारावर चर्चा होणार की नाही हे मात्र चीनने स्पष्ट केलं नाही. चीन हा इराणचा मुख्य व्यापारी भागीदार आहे. इराणकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची खरेदी चीनच करतो. इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांची तमा न बाळगता इराणसोबतचा व्यापार सुरूच ठेवण्याचे संकेत चीनने दिले आहेत. इराणवर आर्थिक निर्बंध लादले गेल्यास अमेरिकेच्या कंपन्यांना तेथील गुंतवणूक काढून घ्यावी लागणार आहे.

अमेरिकेची गुंतवणूक इराणमधून बाहेर पडल्यास चिनी कंपन्या याची भरपाई करू शकतात. 8 मे रोजी अमेरिकेने 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक इराण अणू करारातून अंग काढून घेतले होते. तसेच नवे निर्बंध लादण्याची धमकी दिली होती.