|Monday, April 22, 2019
You are here: Home » क्रिडा » ओस्टापेन्को, अझारेन्का, वावरिंका स्पर्धेबाहेर

ओस्टापेन्को, अझारेन्का, वावरिंका स्पर्धेबाहेर 

वृत्तसंस्था/ पॅरिस

फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून धक्कादायक निकाल पहावयास मिळत असून व्हीनस विल्यम्सनंतर विद्यमान विजेती येलेना ओस्टापेन्को, व्हिक्टोरिया अझारेन्का तर पुरुषांमध्ये स्टॅनिसलास वावरिंका, बर्नार्ड टॉमिक यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. पेत्र क्विटोव्हा, नाओमी ओसाका, मार्को ट्रन्गेलिटी, अलेक्झांडर व्हेरेव्ह, नोव्हॅक ज्योकोविक यांनी दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱया ओस्टापेन्कोला युपेनच्या कॅटरीना कोझलोक्हाकडून 7-5, 6-3 असा पराभव स्वीकारावा लागला. याआधी दोनदा दोघींची गाठ पडली होती, त्यावेळी दोन्ही लढती ओस्टापेन्काने जिंकल्या होत्या. पण या महत्त्वाच्या स्पर्धेत तिला या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. येथील पराभवामुळे ओस्टापेन्को ही ग्रँडस्लॅम जेतेपद राखू न शकणारी सहावी टेनिसपटू बनली आहे. याआधी ऍनास्तेशिया मीस्किना, स्टेफी ग्राफ, जेनिफर कॅप्रियती, स्वेतलाना कुझनेत्सोव्हा, अँजेलिक केर्बर यांना असे अपयश आले होते. ओस्टापेन्को या लढतीत बरीचशी गोंधळलेली दिसत होती तर तिची प्रतिस्पर्धी कोझलोव्हाने तळपायाच्या मागील बाजूस फोड आला असतानाही त्यावर उपचार करून घेत शानदार प्रदर्शन करून तिला धक्का दिला. मागील वषी ओस्टापेन्कोने प्रत्येक सामन्यात जिगरबाज खेळ करीत हरणारी बाजी उलटवून लावत सामने जिंकले होते. पण यावेळी तिला कोझलोव्हाच्या एकाही प्रश्नाला उत्तर देता येत नव्हते. ‘अत्यंत खराब दिवस’ अशी प्रतिक्रिया तिने सामन्यानंतर दिली.

संघर्ष करूनही अझारेन्का बाहेर

दोनवेळची ग्रँडस्लॅम विजेती बेलारुसच्या अझारेन्कालाही पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तिला कॅटरिना सिनियाकोव्हाने 7-5, 7-5 असे नमवित दुसरी फेरी गाठली. अझारेन्काची ही या वर्षातील फक्त पाचवी स्पर्धा होती. मुलाचा ताबा मिळविण्यासाठी तिला न्यायालयीन संघर्ष करावा लागल्याने बराच काळ तिला टेनिसपासून दूर रहावे लागले होते. पहिला सेट गमविल्यानंतर दुसऱया सेटमध्ये तिने पुनरागमनाची लक्षणे दाखविली. बेसलाईनवरील जोरदार जुगलबंदी जिंकत तिने 2-2 अशी बरोबरीही साधली होती. पण तिला हा जोम टिकविता आला नाही. दोन लाईनकॉल्सवरून तिच्या प्रतिस्पर्धीचा तोलही ढळला होता. युरोपमधील क्ले कोर्ट पुनरागमन तिला जडच गेले आहे. माद्रिद ओपनमध्ये ती दुसऱया फेरीत तर रोममधील स्पर्धेत तिला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले होते. माजी अग्रमानांकित असलेली अझारेन्का सध्या जागतिक क्रमवारीत 84 व्या स्थानावर आहे. अझारेन्काने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 2012 व 2013 मध्ये जिंकली होती आणि येथील स्पर्धेत तिने 2013 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

क्विटोव्हा बचावली

झेकच्या पेत्र क्विटोव्हाही पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर (तिसऱया सेटमध्ये 5-4) पडण्याच्या स्थितीत पोहोचली होती. पण सलग तीन बिनतोड सर्व्हिस आणि कठीण समयी कणखरपणा दाखवत तिने पराग्वेच्या व्हेरोनिका सेपेडे रॉइगवर 3-6, 6-1, 7-5 अशी मात करून नामुष्की टाळत दुसरी फेरी गाठली. तिचा हा सलग बारावा विजय आहे. तिची पुढील लढत स्पेनच्या लारा अरुआबॅरेनाशी होईल. जपानच्या 21 व्या मानांकित नाओमी ओसाकाने अमेरिकेय्च्या सोफिया केनिनचा 6-2, 7-5 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. तिची लढत कझाकच्या झरिना दियासशी होईल.

वावरिंका, टॉमिकला धक्का

पुरुष एकेरीत स्वित्झर्लंडच्या 23 क्या मानांकित वावरिंकाचा पराभव हा धक्कादायक निकाल ठरला. त्याला स्पेनच्या गुलेर्मो गार्सिया लोपेझकडून 2-6, 6-3, 6-4, 6-7, 3-6 असा पराभव स्वीकारावा लागला. अर्जेन्टिनाचा मार्को ट्रन्गेलिटी बार्सिलोनाहून 11 तासांचा कार प्रवास करीत पॅरिसमध्ये दाखल झाला होता. पण पहिल्याच फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिकला 6-4, 5-7, 6-4, 6-4 असा पराभवाचा धक्का देत दीर्घ प्रवासाचे सार्थक केले. या स्पर्धेत त्याला नशिबानेच प्रवेश मिळाला होता. शुक्रवारी तो पात्रता फेरीच्या शेवटच्या सामन्यात पराभूत झाला होता. पण नंतर निका किर्गीओसने माघार घेतल्यानंतर भारताच्या पी. गुणेश्वरनला त्याच्या जागी संधी मिळणार होती. पण गुणेश्वरनने तापर्यंत व्हिसेन्झा येथील स्पर्धेत भाग घेतल्याने ट्रन्गेलिटीला कळविण्यात आले. बार्सिलोनामध्ये कुटुंबीयांसह पिकनिकवर असणाऱया ट्रन्गेलिटीने ताबडतोब त्या सर्वांना घेऊन कारने पॅरिस गाठले आणि पहिल्या फेरीत यशही मिळविले. त्याला आता किमान 92,000 डॉलर्स मिळणार आहेत.

अन्य एका सामन्यात द्वितीय मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने लिथुआनियाच्या रिकार्डस बेरान्किसचा 6-1, 6-1, 6-2 अशा फडशा पाडत दुसरी फेरी गाठली. गेल्या वषी तो पहिल्याच फेरीत व्हर्डास्कोकडून पराभूत झाला होता. माजी अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक ज्योकोविकने डुट्रा सिल्वाचा 6-3, 6-4  6-4 असा पराभव करून विजयी सलामी दिली. 

 

Related posts: