|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उजनीतून भीमेला पाणी सोडले

उजनीतून भीमेला पाणी सोडले 

पंढरपूर / प्रतिनिधी

सोलापूर जिल्हय़ांची वरदायिनी असणाऱया उजनी धरणामधून पिण्यासाठी भीमा नदीमधे मंगळवारी उशीराने 800 क्युसेकपर्यंत पाणी सोडण्यात आलेले आहे. तर यावेळी उजनी धरणाची पातळी ही केवळ वजा दोन टक्के इतकी आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, गेल्या काही दिवसापासून उजनी धरणामधून भीमेमधे पाणी सोडण्याबाबत मागणी होत होती. मूळात जलसंपदा विभागाच्या प्रकटीकरणामधे भीमा नदीला पाणी सोडण्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे मोठया प्रमाणावर गेल्या काही दिवसामधे आंदोलने , मोर्चे , निवेदने देखिल झाली. याबाबत आ. प्रशांत परिचारक यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे प्रयत्न केले होते. आणि याचवेळी 29 मे रोजी उजनीमधून भीमेत पाणी सुटणार असल्याचे आश्वासन घेतले होते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपासून 600 क्युसेक तर रात्री अकरा वाजेपर्यत 800 क्युसेकने पाण्याचा विसर्ग भीमेममधे प्रवाहीत करण्यात आलेले होता.

यामधे सदरचा उजनीमधील प्रवाह हा मंगळवारी मध्यरात्री किंवा बुधवारी पहाटे वधारण्याची शक्यता आहे. साधारणपणे बुधवारपर्यत सात ते आठ हजार क्युसेकपर्यत उजनीमधून भीमेमधे एकूण विसर्ग प्रवाहीत करण्यात येईल. अशी आशा आहे. सध्या उजनीतून कालव्याला पाणी सोडण्यात आलेले आहे. सदरचे पाणी दोन दिवसामधे बंद करण्यात येईल. त्यानंतर कालव्यातील उर्वरित साठा देखिल माण नदीमधे प्रवाहीत करण्यात येणार आहे.

उजनीतून भीमेमधे पाणी सुटल्यामुळे, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि सोलापूर शहराचा पाणीप्रश्न सध्यातरी सुटलेला दिसून येत आहे. सदरचे पाणी हे येत्या चार दिवसामधे पंढरपूरमधे येण्याची शक्यता आहे. तर सोलापूरला पाणीपुरवठा करणा-या औज बंधाऱयामध्ये हे पाणी साधारणपणे सात दिवसांमध्ये जावून पोहोचेल, अशी आशा आहे.

सदरच्या पाण्याने भीमा नदीकाठचे सर्व बंधारे हे तीन मीटरपर्यंत भरून घेतले जाणार आहे. येथील अनेक बंधाऱयातून पाणीपुरवठा होउन. जलसंकट दूर होईल.