|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डाकसेवकांचे 10 व्या दिवशीही आंदोलन कायम

डाकसेवकांचे 10 व्या दिवशीही आंदोलन कायम 

प्रतिनिधी /निपाणी :

विविध मागण्यांसाठी ग्रामीण भागातील डाकसेवकांनी 22 मेपासून राष्ट्रीय पातळीवर आंदोलन हाती घेतले आहे. निपाणी भागातील डाकसेवकही या धरणे आंदोलनात सहभागी झाले असून सलग दहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच राहिले आहे. यामुळे ग्रामीण भागातील सर्वच पोस्ट कार्यालये बंद असून टपालसेवा पूर्ण ठप्प झाली आहे.

ग्रामीण भागात काम करणाऱया पोस्ट विभागातील डाकसेवकांना खात्यांतर्गत कर्मचाऱयांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, महिला कर्मचाऱयांना प्रसूति रजा मिळाव्यात, पेन्शन योजना लागू करावी, वाढीव फरक मिळावा आदी सुमारे 15 मागण्यांसाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी सलग दहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. निपाणीतही शहर पोस्ट कार्यालयाच्या आवारात सुमारे 40 डाकसेवक आंदोलन करत आहेत. डाकसेवकांच्या मागण्यासंदर्भात डाकसेवकांच्या राष्ट्रीय पातळीवरील संघांना व पोस्ट विभागाचे डायरेक्टर ऑफ जनाल यांच्यात दोनवेळा बैठका होऊनही तोडगा न निघाल्याने आंदोलन कायम राहिले आहे.

खात्यांतर्गत कर्मचाऱयांप्रमाणे जानेवारी 2016 पासूनच सातवा वेतन आयोग लागू करावा व तेव्हापासूनचा वाढीव फरक द्यावा या मागणीवर डाकसेवक ठाम आहेत. तसेच वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्धार निपाणी भागातील डाकसेवकांनी केला आहे. याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील पोस्टाची सर्वच कामे थांबली आहेत. यामुळे नागरिकांची विशेषतः पेन्शनधारकांची मोठी अडचण झाली आहे. खात्यावर पेन्शन जमा असतानाही आंदोलनामुळे काढता येत नाही, अशी स्थिती बनली आहे.